पाण्याअभावी डाळिंबाची ७०० झाडे काढली

पाण्याअभावी डाळिंबाची ७०० झाडे काढली
पाण्याअभावी डाळिंबाची ७०० झाडे काढली

खुलताबाद, जि. औरंगाबाद : दुष्काळामुळे सालुखेडा (ता. खुलताबाद) येथील शेतकरी किशोर काळे यांच्यावर डाळिंबाची बागच मोडण्याची वेळ आली. फुले अन् फळे लागलेली जवळपास ७०० झाडे त्यांनी शुक्रवारी (ता. ४) काढून टाकली. 

काळे यांनी २०१३ ला डाळिंबाची लागवड केली. पाच वर्षे त्यांनी ती मोठ्या कष्टाने जोपासली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्याने बाग सांभाळणे कठीण झाले. यावरही उपाय म्हणून त्यांनी शेततळे केले. मात्र तेही जेमतेमच भरले. यंदा तर अजूनन सहा महिन्यांच्या दुष्काळजन्य स्थितीला सामोरे जायचे आहे. पाणीच नसेल, तर बाग सांभाळून काय उपयोग, म्हणून त्यांनी ही बाग मोडण्याचा निर्णय घेतला.

त्यांना फळबाग योजनेचा लाभही मिळाला नाही. यंदा पाणी असते, तर किमान चार लाखांचे उत्पन्न निघाले असते. पण दुष्काळाने या उत्पन्नावर पाणी फिरवले. खुलताबाद तालुक्‍यातील खिर्डी, सुलतानपूर, भडजी, वेरुळ, पळसवाडी आदी गावांमधील फळबागांची स्थिती बिकट आहे. या बागाही मोडीत काढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

तालुक्‍यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या. मात्र त्यांना ना स्थानिक बाजारपेठ आहे, ना भावाची स्थिती. त्या फळबागा पांढरा हत्ती सांभाळण्यासारख्याच ठरत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या बाबत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी काळे यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com