रिक्तपदांमुळे नांदेड कृषी विभाग सलाइनवर

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील तब्बल ३१७ पदे रिक्त आहेत. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रिक्तपदांचा अनुशेष दूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
रिक्तपदांमुळे नांदेड कृषी विभाग सलाइनवर
Due to vacancies, Nanded Agriculture Department is on saline

नांदेड : साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांचा कारभार हाती असलेल्या कृषी विभागातील १६ पैकी तब्बल नऊ पदे रिक्त असल्याने या ठिकाणचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. या सोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील तब्बल ३१७ पदे रिक्त आहेत. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रिक्तपदांचा अनुशेष दूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

मराठवाड्यातील सर्वाधीक साडेआठ लाख पेरणीक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्याचा कृषी विभाग सध्या रिक्त पदांमुळे सलाइनवर आला आहे. निम्यापेक्षा अधिक तालुक्यांचा कारभार प्रभारीवर असल्याने या कामाचा ताण प्रभारींना असह्य होत आहे. जिल्ह्यातील एकूण १६ पैकी नऊ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परिणामी, या तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ व इतर कामांसाठी कृषी कार्यालयाचे खेटे घालावे लागत आहेत. कृषी विभागाकडे यापूर्वीच दिडशेपेक्षा अधिक योजनांचा भार आहे. अशातच शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या कामाचा भारही त्यांना सहन करावा लागतो. अशातच पीएम किसान सन्मान योजनेचे कामही कृषी विभागाच्या खांद्यावर आल्याने प्रभारी अधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. कृषी आयुक्तालयासह जिल्हा प्रशासनासोबतच्या बैठकीसाठी माहितीची गोळा बेरीज करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

या सोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकासह एक तंत्र अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी एक, लघूटंकलेखक दोन, आरेखक एक, नाईक एक, शिपाई दोन अशी पदे रिक्त आहेत. या बाबत राज्य शासनाने दखल घेऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांसह इतर रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.  

रिक्त पदांचा तपशील  जिल्ह्यात वर्ग एक अधिकारी मजूर वर्गापर्यंत ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ६४४ पदे भरलेली आहेत. तर तब्बल ३१७ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली. यात सोळा तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी नऊ पदे रिक्त आहेत. यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालकांसह नऊ पदे, ११ कृषी अधिकारी, १० मंडळ कृषी अधिकारी, ६२ अनुरेखक, २४ कृषी पर्यवेक्षक, ७० कृषी सहायक, सहा सहायक अधीक्षक, सहा वरिष्ठ लिपिक, ११ कनिष्ठ लिपिक, १६ वाहन चालक, ५९ शिपाई, १५ रोपमळा मदतनीस, एक नाईक, तीन ग्रेड-एक मजूर, एक स्वच्छ असे एकूण मंजूर ९६१ पदांपैकी ३१७ पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जिल्ह्यातील कार्यरत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या झाल्याने नऊ तालुक्यांचा कारभार प्रभारीवर आहे. कृषी विभागाकडील कामाचा व्याप लक्षात घेता या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यास कामाला गती येईल. - रविशंकर चलवदे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.