गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदी

गोंदिया जिल्ह्यात६० केंद्रांवर दिवाळीनंतर धान विक्रीसाठी गर्दी वाढली आहे. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ८५ हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली आहे.
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदी
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदी

गोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या ६० केंद्रांवर दिवाळीनंतर धान विक्रीसाठी गर्दी वाढली आहे. त्यानुसार गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ८५ हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली आहे.  राइस सिटी अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या खरिपात एक लाख ९० हजार हेक्‍टरवर धान लागवड करण्यात आली होती. त्यातील ४० हजार हेक्टरवर हलके धान होते. दिवाळीपूर्वी हलके धान काढणीस येत असल्याने त्याची विक्री करून उसनवारी फेडत शेतकरी दिवाळी साजरी करतात. यावर्षी मात्र हलक्‍या धानाची काढणी झाल्यावरही हमीभाव केंद्र सुरू झाले नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करावी लागली. मात्र आता दिवाळीनंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू झाले. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ६० केंद्रावर खरेदी होत आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत ८५ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.  जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत ७० केंद्रांवर दरवर्षी धान खरेदी होते. यंदा मात्र केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुमारे १३० धान खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रासाठी आता पर्यंत १२९ सहकारी संस्थांनी अर्ज केले आहेत. त्यातील २३ सहकारी संस्थांचे अर्ज परिपूर्ण असल्याने त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बाजार समित्यांमध्ये देखील हमीभावानुसार खरेदी करता येणार आहे.त्यासंदर्भातील आदेश लवकरच पणन विभागाकडून निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारच्या कायद्यामुळे अडचणीत आलेल्या  बाजार समित्यांना संजीवनी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  तीन महिन्यांत होणार खरेदी धान खरेदी केंद्रावर सहा महिने खरेदीची प्रक्रिया चालते. या वर्षी मात्र ही प्रक्रिया तीन महिन्यांतच पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com