अकाेला जिल्ह्यात दर तिसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्या

अकाेला जिल्ह्यात दर तिसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्या
अकाेला जिल्ह्यात दर तिसऱ्या दिवशी शेतकरी आत्महत्या

 अकाेला : कर्जमाफीसह विविध उपाययोजना शासन करीत असल्याचे सांगते. तरीही शेतकरी आत्महत्यांचे चक्र मात्र थांबलेले नाही. जिल्ह्यात गेल्या वर्षात दरमहा दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १२ महिन्यांत ११८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नापिकी, कर्जबाजारीपणा या आत्महत्यांचे मूळ कारण असल्याचे सर्वश्रुत आहे. तरीही शासकीय मदतीबाबतच्या निकषांमुळे या शेतकरी कुटुंबांना मदत मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. 

अकोला जिल्ह्यात आजवर सुमारे २२०० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यामध्ये ११७५ शेतकरी कुटुंब ही मदतीसाठी पात्र ठरली. मात्र हजारावर कुटुंबांना यंत्रणांनी अपात्र ठरविले आहे. 

जिल्ह्यात गेल्या काळात दिलासा अभियान राबविण्यात आले. शासनाकडून कर्जमाफीही जाहीर झाली. मात्र या उपाययोजना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी पुरेशा ठरलेल्या नाहीही, हे मागील वर्षीच्या आत्महत्यांच्या आकडेवारीहून स्पष्ट होते. 

वर्षभरात शेतमालाला पुरेसे बाजारमूल्य मिळत नसल्याची बाब सातत्याने चर्चेत होती. सध्याही शेतीमालाच्या भावाचा विषय सुटलेला नाही. यावर्षात तर अनियमित पावसामुळे आधी खरिपाचे उत्पादन घटले. नंतर परतीचा पाऊस न आल्याने रब्बीसुद्धा अर्धाच लागवडीखाली आला. रब्बी पिकांचेही उत्पादन जेमतेम येत आहे. अशा स्थितीत त्याच्या कुटुंबाला दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे.

शासनाकडून उपाययोजनांबाबत वेळोवेळी दावे केले जातात. मात्र या उपाययोजना पुरेशा नाहीत, हे स्पष्ट होते.  मागील वर्षात झालेल्या ११८ आत्महत्यांपैकी ६६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. यातील ३१ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी स्पष्टपणे नाकारण्यात आली. दुसरीकडे उर्वरित प्रकरणांमध्ये अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. मदत मिळण्यात शासकीय अनास्था व नियम अडथळ्याचे ठरले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com