शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!

पिकांना पाणी देताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. इतकेच नव्हे तर वीजपुरवठा ही रात्रीचा असल्याने शेतकऱ्यांना रात्री कडाक्याच्या थंडीत ओलित करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना ही थंडी लागते भाऊ, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!
Farmers also feel cold, brother!

जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. याशिवाय या भागात रब्बी हंगामात हिरव्या भाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. इतकेच नव्हे तर वीजपुरवठा ही रात्रीचा असल्याने शेतकऱ्यांना रात्री कडाक्याच्या थंडीत ओलित करावे लागत असल्याने शेतकऱ्यांना ही थंडी लागते भाऊ, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

शेतकरीवर्ग शेतीपंपाद्वारे शेतात पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न करतो. रात्रीचे शेतात साप, विंचू प्रमाणे वन्यप्राण्यांची दहशत असून, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. दिवसातून केवळ ७ तास वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातही थंडीत पुन्हा वाढ झाली असल्याने त्यांना जोखीम पत्करून रात्री शेतात जावे लागत आहे. 

महावितरणने कृषिपंपांना २४ तास वीज देण्याचा निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसांची मागणी असली, तरी केवळ ६ ते ७ तास शेतकऱ्यांना वीज मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरण कंपनीविरोधात रोष निर्माण झाला आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केल्यानेच हा तोटा होत आहे. अशी चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची भरपाई महावितरणमार्फत देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

नरखेड तालुक्याचा काही परिसर हा आदिवासीबहुल असून त्यांची शेती मोठ्या प्रमाणात जंगलाला लागून आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात गेल्यास जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असे अपघात झालेले आहे.   - रितेश ठाकरे, शेतकरी, उमठा 

थंडी दिवसेंदिवस वाढत आहे. कृषिपंपांसाठी दिवसभराचे लोडशेडिंग शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागत आहे. महावितरण कंपनीने रात्री लोडशेडिंग करून शेतकऱ्यांना मदत करून दिवसभर वीजपुरवठा देऊन शेतकऱ्यांची या कडाक्याच्या थंडीत ओलित करण्यापासून सुटका करावी.  - चेतन खोडे, प्रगतशील शेतकरी, उतारा 

कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी सकाळी १० ऐवजी ११ वाजता कार्यालयात येत आहेत. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी थंडीत शेतकऱ्यांना पाणी देणे कसे शक्य होणार, हा प्रश्‍न अजूनही चर्चेचा विषय आहे.  - शंकर धर्मे, शेतकरी, जलालखेडा

साहेब, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम का? सरकार त्यांना सवलत देऊ शकते, पण शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्रीच्यावेळी पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. हा कसला न्याय? शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे.  - मोहन मातकर, शेतकरी, थडीपवनी 

एकीकडे वन्यप्राण्यांमुळे पिकांना वाचविण्यासाठी तारेची कसरत करावी लागते, तर दुसरीकडे महावितरण कंपनीच्या प्रतापमुळे थंडीत ओलित करावे लागत आहे. दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांचे हाल सुरू असून देखील कोणीच त्याच्या बाजूने उभे राहत नाही, ही शोकांतिका आहे. शेतकरी हा निवडणूक पुरताच मर्यादित विषय राजकीय नेत्यांसाठी झाला आहे. निवडणूक संपली की त्याचे हाल समजून घेण्याची कोणाची ही तयारी नसते.  - साहेबराव मोरेकर, शेतकरी  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.