तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाफेडच्या खरेदीकडे पाठ

खरेदी केंद्र
खरेदी केंद्र
परभणी ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ११ खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या ८१४४ शेतकऱ्यांपैकी ३४०५ शेतकऱ्यांच्या २१ हजार ८७१.५६ क्विंटल शेतीमालाची खरेदी करण्यात आली आहे; परंतु नोंदणी केलेल्या निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७३९ शेतकऱ्यांनी जाचक अटी, नियमांमुळे तूर्त नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
 
मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाचे खुल्या बाजारातील दर कमी झाल्यामुळे आधारभूत किंमत दराने खरेदी करण्यासाठी आॅक्टोबर महिन्यापासून परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत,गंगाखेड, पूर्णा या सहा ठिकाणी, तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार, कळमनुरी, सेनगाव या पाच ठिकाणी नाफेडची खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली.१३ डिसेंबरपासून मूग आणि उडीद खरेदी बंद झाली आहे.
 
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४२६ शेतकऱ्यांचा ४४८३ क्विंटल मूग खरेदी करण्यात आला असून, ८६० शेतकऱ्यांनी मात्र मूग विक्रीस आणला नाही. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८६ शेतकऱ्यांचा ५६४.८५ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला आहे. हमीदरानुसार (प्रतिक्विंटल ५,४०० रुपये) खरेदी केलेल्या उडदाची किंमत २ कोटी ७३ लाख ५ हजार १९० रुपये होते.
 
खरेदी केलेल्या उडदापैकी ४१३२.५० क्विंटल उडीद वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला असून, ९३२.३५ क्विंटल उडीद अद्याप साठविण्यात आलेला नाही. दोन जिल्ह्यांतील एकूण ३८९ शेतकऱ्यांनी या केंद्रावर उडीद विक्रीस आणला नाही.

मूग, उडीद, सोयाबीन विक्रासाठी परभणी जिल्ह्यातील २७०७ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील ५४३७ अशा एकूण ८१४४ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर शेतमाल घेऊन येण्यासाठी मोबाईल संदेश पाठविण्यात आले होते; परंतु शुक्रवार (ता. २२) पर्यंत दोन्ही जिल्ह्यांतील ३४०५ शेतकऱ्यांचा मूग, उडीद, सोयाबीन असा एकूण २१ ८७१.५६ क्विंटल शेतीमाल खरेदी करण्यात आला आहे. तूर्त ४७३९ शेतकऱ्यांनी अद्याप नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीस आणलेला नाही.

दोन जिल्ह्यातील एकूण ४२७३ शेतकऱ्यांपैकी ७९३ शेतकऱ्यांचा १२,३२२.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. ३४८० शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणले नाही. खरेदी केलेल्यापैकी १०,३४३ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठविण्यात आले आहे. १९७९.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com