शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे - नितीन गडकरी

आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे न वळता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे.
Farmers should turn to bamboo cultivation - Nitin Gadkari
Farmers should turn to bamboo cultivation - Nitin Gadkari

लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे न वळता बांबू लागवडीकडे वळण्याची गरज आहे. आज देशाला ८ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते. त्या ऐवजी तांदूळ, बांबूपासून इथेनॉल बनवले तर परकीय चलन वाचेल. २०२५ पर्यंत इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. परदेशात जाणारे पैसे वाचले तर तेच शेतकऱ्यांच्या घरात ते येतील, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.  लोदगा येथे केंद्र शासन, फिनिक्स फाउंडेशन आणि व्ही ई कमर्शिअल व्हेईकल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. गुरुवारी (ता. २५) झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून खासदार उन्मेश पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे, उपस्थित होते. यावेळी संस्थेचे प्रमुख माजी आमदार पाशा पटेल व परवेज पटेल यांनी सर्वांचे स्वागत केले.  गडकरी म्हणाले, ‘‘देशाला आज २२ लाख तज्ज्ञ वाहन चालकांची आवश्यकता आहे. देशात प्रति तासाला होणाऱ्या अपघातात ४१५ जणांचा मृत्यू होतो. यात तरुणांची संख्या ७० टक्के आहे. वाहन चालविण्यासंदर्भात प्रशिक्षण गरजेचे आहे. यातूनच लोदगा (ता. औसा) येथे देशातील पहिली फिनिक्स आयशर वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यात आली आहे. याचे काम प्रेरणादायी ठरेल. रस्त्यांचा दर्जा सुधारला जात आहे. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी अपघात निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून १५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाशा पटेल यांनी केले. 

शेतकरी ऊर्जादाता बनावा  बांबू लागवडीसाठी पाशा पटेल यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचे कौतुक त्यांनी केले. बांबू हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. थर्मलमध्ये कोळशाऐवजी बांबूचा वापर करण्यास आता सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे भविष्यात बांबूला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. बांबू लागवडीतून वर्षाकाठी एकरी ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळने गरजेचे आहे. शेतकरी हा अन्नदाता तर आहेच पण आता त्याने ऊर्जादाता बनावे. स्वतःला तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे, असेही गडकरी म्हणाले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com