खरीप कांदा लागवडीसाठी तारेवरची कसरत  

जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीसाठी बियाण्यांची टंचाई असल्याने दरवाढ झाली असताना रोपवाटिका तयार झाल्यानंतर मर रोग वाढल्याने रोपांचा तुटवडा निर्माण झाला.
Onion planting
Onion planting

नाशिक: जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीसाठी बियाण्यांची टंचाई असल्याने दरवाढ झाली असताना रोपवाटिका तयार झाल्यानंतर मर रोग वाढल्याने रोपांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा रोपे टाकून तर, काहींनी महागडी रोपे घेऊन लागवडी करण्यासाठी हालचाली केल्या. तरीही सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लागवडी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची ओढाताण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण प्रस्तावित २० हजार ५८४ हेक्टर क्षेत्रापैकी (ता.१२ अखेर) २३ हजार ०७८.५० हेक्टर क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. लागवडी दिसत असल्या तरी हवामान बदल, सततचा पाऊस यामुळे लागवडी बाधित होत आहेत. त्यामुळे पुनर्लागवड झाल्यानंतर सतत पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी वाढीवर परिणाम होत आहे. एक बाजूला आर्थिक फटका तर दुसरीकडे हवामान बदलांचा फटका कांदा उत्पादकांना सोसावा  लागत आहे.  चालू वर्षी मालेगाव, चांदवड, सटाणा, तालुक्यात लागवडी वाढल्या आहेत. मात्र येवला तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवडीखालील क्षेत्र असताना या ठिकाणी लागवडी पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे चित्र आहे. तर कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यांत लागवडी कमी असतात. मात्र याही ठिकाणी क्षेत्र घटल्याचे समोर आले आहे. तर नाशिक, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यात लागवडी  शून्यावरच आहेत.  खरीप कांदा लागवडी १५ सप्टेंबरपर्यंत चालतात. ही लगबग सुरूच आहे. मात्र कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या नियोजित लागवडी पूर्ण झालेल्या नाहीत. परिणामी त्या पूर्ण करण्यासाठी रोपांची शोधाशोध करण्यात आली. अधिक पैसे देत रोपांची उपलब्धता करत काहींनी लागवडीची पूर्ण केल्या आहेत. पावसाने रोपे झाली खराब जिल्ह्यात ६५०१ हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. मात्र सततचा पाऊस व दमट हवामानामुळे रोपांची मोठ्या प्रमाणावर मर झाल्याने रोपे खराब झाली. परिणामी, लागवडी पूर्ण करण्यात अडचणी आल्या आहेत.

प्रतिक्रिया रोपवाटिका तयार करताना मोठ्या प्रमाणावर रोपे खराब झाली. त्यामुळे लागवडी पूर्ण करताना अडचणी वाढल्या.  आता ज्या लागवडी झालेल्या आहेत. त्याही खराब होत आहेत. -माधव भोसले, कांदा उत्पादक, ठाणगाव, पिंप्री, ता. येवला

पावसामुळे निम्मी रोपे खराब झाली. या वाचलेल्या रोपांमधून लागवडी पूर्ण कराव्या लागल्या. त्यामुळे क्षेत्र तर घटलेच शिवाय हवामान प्रतिकूल असल्याने उत्पादन घटणार आहेत. -संदीप मोरे, कांदा उत्पादक, खामखेडा, ता. देवळा १२ सप्टेंबरपर्यंतची कांदा लागवड (हेक्टर)

तालुका सर्वसाधारण क्षेत्र  लागवड
मालेगाव  २४३०  ४५१०
सटाणा   १२००  २११६
नांदगाव   ५४०    २२९०
कळवण  ३७५  ७५
देवळा   १५१५   १०६४
दिंडोरी    १९५   ११
सुरगाणा   १०  
नाशिक   १३५   ०
इगतपुरी   ५६
निफाड  ४५०     २४५
सिन्नर    ५१८  ३६०
येवला    ८३०० ६१४१
चांदवड  ४८६०  ६२६५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com