विद्यापीठाच्या कांदा बियाणे दरवाढीने शेतकऱ्यांत नाराजी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्याची विक्री गेल्या वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे.
onion
onion

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्याची विक्री गेल्या वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. मात्र मागील वर्षी प्रतिकिलो १५०० रुपये असलेले दर चालू वर्षी २००० रुपये केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा बियाण्याचे दर मागील वर्षीप्रमाणे ठेवावे, अशी कांदा उत्पादक शेतकरी व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मागणी केली आहे. 

मागील वर्षी राज्यातील १३ जिल्ह्यांमधून ५ हजारांवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या ‘फुले समर्थ’ आणि ‘बसवंत-७८०’ या बियाण्यास पसंती दिली होती. विद्यापीठाकडे ४,२२० किलो बियाण्याची उपलब्धता होती. प्रतिकिलो १५०० रुपये दर असल्याने ही उलाढाल ६३ लाखांवर झाली होती. मात्र चालू वर्षी अवघे ३००० किलो बियाणे विक्रीयोग्य असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. अपेक्षित उत्पादनात घट आल्याने व उपलब्धता कमी असल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. 

चालू वर्षी विद्यापीठाकडून संगणक प्रणालीमध्ये योग्य त्या सुधारणा करून ११ जूनला ऑनलाइन विक्री होणार आहे. या पद्धतीचे शेतकऱ्यांकडून स्वागत असले, तरी दरवाढीला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे मागील वर्षी खरीप कांदा उत्पादनात मोठे नुकसान झाले असताना ही दरवाढ परवडणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  उत्पादन ७० टक्क्यांनी घटले  चालू वर्षी १० हजार किलो उत्पादन अपेक्षित होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे बीजोत्पादन प्रक्रियेत अडचणी आल्याने ७० टक्के नुकसान झाले. त्यामुळे अवघे ३ हजार किलो बियाणे उपलब्ध आहे. त्यातच बीजोत्पादन प्रक्रियेस कुठलेही अनुदान नसल्याने विद्यापीठ स्व भांडवलातून बियाणे तयार करते.नुकसान अधिक असल्याने दरवाढ झाली. मात्र खासगी बियाण्यांच्या तुलनेत दर कमी असल्याचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळुंके यांनी सांगितले.  १५०० रुपये प्रतिकिलोनेच बियाणे विक्री व्हावी  चालू वर्षीचे दर किलोमागे ५०० रुपयांप्रमाणे वाढले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून मागील वर्षीप्रमाणे १५०० रुपये प्रतिकिलो प्रमाणेच उपलब्ध करून द्या. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना आदेश द्या, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे यांना देत मागणी केली आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com