कोकणातील शेतकऱ्यांची दिवाळी शेतात

ऐन दिवाळीत कोकणातील शेतकरी शेतीकामांमध्ये व्यस्त आहेत
ऐन दिवाळीत कोकणातील शेतकरी शेतीकामांमध्ये व्यस्त आहेत

रत्नागिरी  ः अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘क्यार’ वादळाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात कमी झाला असून दिवाळीच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली. रविवारी सकाळी पडलेल्या कोवळ्या उन्हाचा आनंद घेत शेतकऱ्यांनी दिवाळी पहाट साजरी केली. फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर मात्र मंडणगड, राजापूर, रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांनी लगेचच शेताची वाट धरली होती. पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या भाताची कापणी करून घेण्यास आता सुरवात झाली आहे.

गेले आठ दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस होता. कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात तयार झालेले क्यार चक्रीवादळ यामुळे भातशेतीसही मच्छीमारांना मोठा फटका बसला. ऐन दिवाळीच्या तोंडावर भातकापणीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला.  तयार झालेली भातशेती कोसळणाऱ्या‍ पावसात उघड्या डोळ्यादेखत आडवी होताना पाहण्याची वेळ कोकणातील शेतकऱ्यांवर आली होती. आकाश फाटलं होतं, पण ठिगळ कोठे लावयचं असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत होता. क्यार चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकल्यानंतर दिवाळीच्या दिवशी जिल्ह्यात सगळीकडेच ऊन पडलं होतं. संगमेश्‍वर तालुक्यात काहींनी दिवाळी साजरी करत भात सुकण्याची प्रतिक्षा केली आहे; परंतु मंडणगड, राजापुरात राहिलेलं भात कापून ते सुकवण्यासाठी ठेवले जात आहे. राजापूरमध्ये काही गावांत कापलेल्या भाताच्या अडव्या कोसळून ते झोडून घेण्यासाठी सुरवात झाली आहे.

एकीकडे दिवाळीचा आनंद असला तरीही पावसाचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सर्वाधिक महत्त्व दिले आहे. मंडणगड तालुक्यात पावसाबरोबरच लष्करी अळीचा मोठा प्रभाव असल्यामुळे कापणीशिवाय पर्यायच उरलेला नाही. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे हाती लागेल तेवढं भात कापून ते पदरात पाडून घेण्यासाठी तारांबळ सुरू झाली आहे.  सध्याच्या परिस्थितीबाबत राजापूर तालुक्यातील शिळ गावातील शेतकरी मंगेश बाईत म्हणाले, की पावसाने उसंत घेतली आहे. कापणीसह झोडणीच्या कामाला आधीच उशीर झाला आहे. ऊन पडल्यामुळे झोडणीची कामे आम्ही दिवाळीच्या दिवशीही पूर्ण करून घेत आहोत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com