
अमरावती : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात काही हजार रुपयांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एक्स-रे मशिनचा मुद्दा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पशुसंवर्धन आयुक्तांकडे उपस्थित केला होता. सोबतच या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाने अमरावती येथील एक्स-रे मशिनची तत्काळ दुरुस्ती करून इतर दवाखान्यातील मशिन दुरुस्तीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. जनावरांमधील आजारांचे निदान करण्यासाठी, एक्स-रे व सोनोग्राफी मशिनचा उपयोग केला जातो. मात्र जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात या मशिन बंद होत्या. एक्स-रे सोनोग्राफी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यात कार्यरत पशुवैद्यकांना आपल्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी आयतीच संधी मिळाली होती. एक्स-रे, सोनोग्राफी सोबतच इतरही अनेक यंत्र बंद असल्याने पशुपालकांना त्यांच्या आजारी जनावरांचे नमुने तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात सांगितले जात होते. त्या ठिकाणीदेखील निदान न झाल्यास पुणे येथील प्रयोगशाळेत हे अहवाल पाठविण्यात येत होते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने या दरम्यान उपचाराअभावी जनावर दगावत होती. पशुसंवर्धन खात्याच्या या दुटप्पी धोरणाबद्दल पशुपालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत बच्चू कडू यांनी पशुसंवर्धन आयुक्त, सचिव यांना पत्र लिहीत अमरावती जिल्ह्यातील पशुसंवर्धन खात्याच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कडू यांच्या पत्रानंतर पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी समितीचे गठण करण्यात आले. या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या संदर्भाने प्रतिक्रियेसाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कारवाईची मागणी समितीकडून प्रयोगशाळेतील उपकरणांचा आढावा घेण्यात आला असता सोनोग्राफी मशिनद्वारे सप्टेंबर २०२१ पर्यंत ३६ तपासण्या करण्यात आल्या. ऑक्टोबर २०२१ पासून मशिनचा डिस्प्ले नादुरुस्त झाला. त्यानंतर मशिन वापरणे बंद झाले. सदर मशिन १७ जून २०११ रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार मशिनला दहा वर्षांचा कालावधी झाला आहे, तर एक्स-रे मशिन २०१६ पासून बंद आहे. या मशिनच्या दुरुस्ती करता अवघ्या आठ हजार रुपयांचा खर्च आहे. त्या संदर्भाने कोटेशनदेखील घेण्यात आले होते. तांत्रिक मंजुरीही घेण्यात आली. मात्र दुरुस्तीचे काम झाले नाही. परिणामी ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एक्स-रे मशिन गेल्या अनेक वर्षापासून बंद राहिली. त्याला जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाईची मागणी पशुपालकांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.