एकीचे बळ, मिळते फळ; रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनीची भरारी

‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या वचनाप्रमाणे पाचशे शेतकरी एकत्र आले आणि सुरू झाली रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनी.
sangli
sangli

‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ' या वचनाप्रमाणे पाचशे शेतकरी एकत्र आले आणि सुरू झाली रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनी. शेतकऱ्यांची साथ आणि ग्राहकांचा विश्‍वास या जोरावर गोटखिंडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनीने भरारी घेतली आहे.  शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि दर चांगला मिळाला तरच आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्वतःचे शेतीमाल विक्री मॉडेल उभे करणे आणि ते चालवणे फार कठीण असल्याचा अनुभव येतो. असाच अनुभव गोटखिंडी (जि. सांगली) येथील वैभव कोकाटे यांना आला. कोकाटे हे हरितगृहात विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्यांना परिसरातील पाच शेतकरी मित्रांची चांगली साथ मिळाली. मात्र भाजीपाला विक्रीची वेळ आल्यावर त्यांना बाजारपेठ लवकर मिळाली नाही. परंतु प्रयोगशीलता, अपार कष्ट यामध्ये सातत्य ठेवल्याने त्यांनी स्वतः नवीन बाजारपेठ शोधली. यातूनच पुढे शेतकऱ्यांना एकत्र घेऊन कंपनी आणि भाजीपाला विक्रीची दिशा मिळाली. 

सुरू झाली शेतकरी कंपनी  कुटुंब, मित्रांची भक्कम साथ आणि सचोटीच्या जोरावर वैभव कोकाटे यांनी शेतकरी कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. आत्मा विभागाने ‘फार्मर प्रोड्यूसर कंपनी‘ स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांतून १६ मे २०१५ रोजी रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन झाली. मात्र पुढे एक नवे आव्हान उभे होते, ते म्हणजे शेतकऱ्यांना एकत्र करण्याचे. कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री व्यवस्थेची साखळी आणि हमीभाव या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांबरोबर करार आणि खरेदीचा दर देखील जाहीर केला. कंपनीने शेतकऱ्यांच्या बांधावरुन भाजीपाला खरेदी करण्यासह विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळण्याची हमी दिली. त्यामुळे वीस गुंठ्यांपासून ते चार एकरांपर्यंत भाजीपाला लागवड करणारे शेतकरी कंपनीचे सभासद झाले. कंपनीने भाजीपाला विक्रीसाठी मुंबई आणि पुण्यातील बाजार समितीत भाडेतत्त्वावर गाळे घेतले आहेत. 

विक्री साखळी केली भक्कम  कंपनीने शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार केली. परंतु मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव झाला आणि भाजीपाला विक्रीचे गणित कोलमडले. मात्र या संकटातून नवी वाट दिसली. कंपनीने मागमीनुसार विविध वजनांमध्ये भाजीपाला पॅकिंग करून थेट विक्रीचा पर्याय स्वीकारला. पुणे शहरासह सांगली, कोल्हापूरमध्ये थेट विक्रीला सुरुवात झाली. यामुळे विक्री साखळी भक्कम झाली. कंपनीने वीस शेतकऱ्यांचा एक गट तयार केला. गटातील शेतकऱ्यांना कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करावी, काढणी कधी करावी याची माहिती एकाच वेळी दिली जाते. त्यामुळे काढणीपश्‍चात पॅकिंग आणि विक्री शक्य होते. शेतकऱ्यांनी केवळ भाजीपाला उत्पादन करणे हा उद्देश डोळ्यांसमोर न ठेवता बियाणे, खते आणि पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन आणि उत्पन्नही मिळते. 

कंपनीचे स्वतःचे ॲप  शहरी भागात भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने ॲप विकसित केले आहे. यामुळे ग्राहकांना त्यांची मागणी नोंदविणे शक्य होते. याचबरोबरीने ॲपमध्ये ग्राहकांना सूचना देखील मांडण्यासाठी स्वतंत्र विभाग ठेवला आहे. त्यामुळे पुढील नियोजन सोपे जाते.  कंपनीचे नियोजन 

  • कंपनीचे सभासद ः ५०७ 
  • सभासद फी ः एक हजार रुपये 
  • प्रकल्प आराखडा ः १८ लाख 
  • मिळालेले अनुदान ः ११ लाख 
  • वार्षिक उलाढाल ः ५० लाख 
  • भाजीपाल्याची प्रतवारी, पॅकिंग करून विक्री 
  • विक्री ः मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर 
  • दररोज अडीच टन भाजीपाल्याची विक्री 
  • भाजीपाला पुरवठा करण्यासाठी स्वतः एक गाडी. गरजेनुसार भाडेतत्त्वावर गाडी घेतली जाते. 
  • कतारमध्ये रताळी, कडधान्य निर्यातीस सुरुवात. 
  • प्रतिक्रिया वीस गुंठ्यांपासून ते पाच एकरांवर भाजीपाला लागवड करणारे शेतकरी आमच्यासोबत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे निवडीपासून ते काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतो. यामुळे उत्पादन वाढीस मदत होते. आम्ही हमीभाव देत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो.  - वैभव कोकाटे, अध्यक्ष, रत्ना फार्मर प्रोड्यूसर कंपनी, ९८२२२४३१३२  गेल्या दोन वर्षांपासून मी कंपनीचा सभासद आहे. भाजीपाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळते. यामुळे शेती खर्चात बचत झाली. भाजीपाल्यास कंपनीकडून हमी दर मिळतो आहे.  - आकाश पाटील, कामेरी, जि. सांगली

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com