श्रीलंकेत शेतीमाल पाठविणाऱ्या निर्यातदारांना घातला गंडा

श्रीलंकेत शेतीमाल पाठविणाऱ्या निर्यातदारांना घातला गंडा
श्रीलंकेत शेतीमाल पाठविणाऱ्या निर्यातदारांना घातला गंडा

नागपूर ः भारतातून श्रीलंकेत शेतीमालाची आयात करणाऱ्या काही आयातदारांनी भारतीय निर्यातदारांची फसवणूक केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भाने तक्रारी झाल्यानंतर संबंधित आयातदाराची पडताळणी करण्यात आली असता, यातील बहुतांश कंपन्या कोठेही नोंदणीकृत नसल्याचा गंभीर वास्तव्यदेखील समोर आले आहे.  भारतातून कांदा, मिरची, संत्रा तसेच इतर शेतीमालाची निर्यात श्रीलंकेत होते. त्या ठिकाणी असलेल्या आयातदारांकडून मागणी आल्याप्रमाणे भारतीय निर्यातदार त्यांना पुरवठा करतात. गेल्या वर्षभरात कांदा आणि मिरचीची मोठी निर्यात श्रीलंकेत करण्यात आली. परंतु यातील बहुतांश भारतीय निर्यातदारांना त्यांचे पैसेच मिळाले नाही, तर काही श्रीलंकन आयातदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. भारतीय निर्यातदारांनीही बाब सरकारमार्फत दुतावासाला कळविली. 

कोलंबोतील भारतीय दूतावासाने त्याची दखल घेत चौकशी केली. या चौकशीत भारतातून शेतीमालाची आयात करणाऱ्या काही श्रीलंकन आयातदार कंपन्या नोंदणीकृतच नसल्याचा खुलासा झाला. काही कंपन्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून पैसे देण्यासंदर्भाने टाळाटाळ होत असल्याचेही दूतावासाच्या निदर्शनास आले. भविष्यात अशा प्रकारचे धोके टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी याकरिता निर्यातदारांसाठी ॲडव्हायझरीदेखील भारतीय दूतावासाने त्यांच्या संकेतस्थळावर टाकली आहे.

आयातदारांची यादी वेबसाइटवर भारतीय दूतावासाच्या वाणिज्यिक शाखेने त्यांच्या संकेतस्थळावर अनधिकृत आणि वादातीत आयातदार श्रीलंकन कंपन्यांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर टाकल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची फसवणूक राज्यातील इतर शेतीमालाच्या बाबतीही होऊ शकते ही शक्‍यता लक्षात घेता अनेक फळ आणि भाजीपाला उत्पादक महासंघांना सावधगिरीचा इशारा देणारे पत्र दूतावासाने पाठविले आहे. उत्पादक महासंघांना निर्यातीपूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनदेखील या पत्रातून करण्यात आले आहे. ऑरेज ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अमोल तोटे यांनादेखील अशा प्रकारचे पत्र पाठविण्यात आले असून, निर्यातीबाबत सतर्कतेचा सल्ला त्यातून दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com