agri fund
agri fund

शेतीच्या हाती यंदा भोपळा?

सरकारच्या नव्या धोरणामुळे शेतकरी कल्याण योजनांमध्ये मोठी आर्थिक कपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही कपात किमान ११०० कोटींच्या आसपास राहू शकते.

पुणे: राज्याची कृषी व्यवस्था लॉकडाऊनमुळे जर्जर झालेली असताना सरकारच्या नव्या धोरणामुळे शेतकरी कल्याण योजनांमध्ये मोठी आर्थिक कपात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही कपात किमान ११०० कोटींच्या आसपास राहू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडल्यानंतर राज्याच्या तिजोरीत मोठी तूट तयार झालेली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अर्थ विभागाने सर्व सरकारी कामांवर बंदी आणली आहे. ‘‘चालू कामे स्थगित करा, नवीन कामांचे प्रस्ताव सादर करू नका. तसेच, फक्त ३३ टक्के निधीत कामे भागविण्याचे नियोजन करा,’’ अशा सूचना विविध खात्यांना देण्यात आल्या आहेत.  ‘‘कृषी विभागाला २०२०-२१ अर्थसंकल्पीय वर्षात किमान १६०० कोटी रुपये विविध योजनांसाठी मिळणे अपेक्षित होते. कपात धोरणामुळे आता फक्त ३३ टक्के निधी मिळेल. त्यामुळे ११०० ते १२०० कोटी रुपयांना कात्री लागण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास शेतकरी योजनांच्या वाट्याला अवघे ५०० ते ६०० कोटी रुपये येतील,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  राष्ट्रीय पातळीवरील कृषी योजनांसाठी केंद्राकडून यंदा १२०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी किमान ८०० कोटी रुपये राज्यालाही टाकावे लागणार आहेत. त्यामुळे राज्य हिस्सा रक्कम व याशिवाय राज्याच्या स्वतःच्या शेती विषयक योजना, अशा दोन बाबींवर कृषी विभागाला पैसा उपलब्ध करून द्यावा लागेल.  कृषी विभाग युक्तिवाद करेल राज्य शासनाच्या कपात धोरणाच्या सूत्रामुळे आम्ही चिंतेत आहोत. कृषी विभाग सध्या विविध योजनांचा आढावा घेत आहे. कोणत्या योजनांना प्राधान्य द्यावे याविषयी बारकाईने अभ्यास करून अहवाल तयार केला जात आहे. अर्थात, चांगल्या योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी विभागाकडून अर्थ खात्यासमोर युक्तिवाद केला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. शासनाला बारकाईने विचार करावा लागेल इतर खात्यात एकवेळ निधी कपात चालू शकेल. पण, शेतकरी योजनांचा निधी कापताना शासनाला बारकाईने विचार करावा लागेल. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी राज्य हिस्सा द्यावाच लागेल. तसेच कृषी कर्मचाऱ्यांचे मानधन, वेतन, निवृत्तिवेतन याचाही विचार करावा लागेल, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com