आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला पाऊस : हवामान विभाग

पाऊस
पाऊस

पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. लवकरच मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. बुधवारपासून (ता. २६) मॉन्सूनचे प्रवाह सौम्य होणार असल्याने पावसात आठवडाभर खंड पडणार आहे. मात्र, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. आठ ते दहा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.  बुधवारनंतर (ता. २६) राज्यात पावसात परत एकदा खंड आढळून येईल, जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पावसात पडणाऱ्या खंडाच्या पार्श्वभमीवर जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पावसातील खंडाबाबत बोलताना डॉ. कश्यपी म्हणाले, मॉन्सूनच्या पावसामध्ये टप्पे असतात. यात मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय, कमजोर होत राहतात. त्यामुळे काही दिवस पाऊस, नंतर खंड आणि पुन्हा पाऊस अशा स्वरूपात हा पर्जन्यमान असते. यंदा मॉन्सून जवळपास १५ दिवस उशिराने आला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे मॉन्सून सक्रीय होऊन राज्यात पाऊस पडू लागला. २६ जून पर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल, तर कोकणात पाऊस सुरूच राहील. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील पर्जन्य छायेच्या प्रदेशातही कमी अधिक पाऊस पडत राहील. उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी होईल. 

कमी कालावधीची पिके घ्यावीत मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी न कोसळल्याने राज्यात जमीन पूर्णपणे कोरडी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने ती भिजून जाईल. मात्र जेथे पाऊस कमी आहे, तेथे सिंचनाची सुविधा असेल तरच पेरणी करावी. ‘वायू’ वादळामुळे झालेल्या पावसाने कोकणात जमीन यापूर्वीच भिजली आहे. यापुढे तेथे पाऊस सुरू राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणी करावी. इतर विभागात सिंचनाची सुविधा असेल, तरच पेरणी करावी, अन्यथा चांगला पाऊस होईपर्यंत थांबावे. पिके घेताना कमी कालावधीची साधारणत: ९० ते १०० दिवसांची पिके घ्यावीत. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com