अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार जीआय मानांकन

पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी एक वर्षाचा कालावधी जाईल. मात्र मानांकन मिळाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी एकत्र आले तर त्यांना प्रगती साधण्याची खूप मोठी संधी मिळेल. त्याशिवाय पांढऱ्या कांद्याचे महत्त्व जगासमोर येईल. - डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
अलिबाग पांढरा कांदा
अलिबाग पांढरा कांदा

चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआयचे मानांकन मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रायगड जिल्हा परिषद आणि पुण्यातील जीएमसीसी संस्थेने पुढाकार घेतला आहे.   या संस्थांमध्ये नुकताच करार करण्यात आला. या वेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक पराग हळदणकर, रायगड जिल्हा आत्माचे अधिकारी पांडुरंग शेळके, विकास पाटील, विद्यापीठाचे संशोधक जितेंद्रकुमार कदम, डॉ. केशव पुजारी, डॉ. संजय तोरणे आदी उपस्थित होते. अलिबागचा पांढरा कांदा बाजारपेठेत आपले वेगळे स्थान टिकवून आहे. त्याचा दर जास्त असल्यामुळे बाजारपेठेत लाल कांद्याबरोबर त्याला स्पर्धा करावी लागते. औषधी गुणधर्म आणि खवय्यांना भुरळ घालणाऱ्या या कांद्याला चांगला दर असूनही शेतकरी त्याची लागवड करण्याकडे दुर्लक्ष करतात. या कांद्याला राजाश्रय आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तीन संस्थांनी पुढाकार घेतला आहे.  शेतकरी एकत्रीकरण, अपेक्षित वाण निवडीसाठी आत्मा यंत्रणा प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पासाठी आत्माकडून निधी दिला जाणार आहे. या वाणाची तांत्रिक माहिती, संशोधन आणि अपेक्षित शास्त्रीय माहिती संकलनाची जबाबदारी कोकण कृषी विद्यापीठाने घेतली आहे. कांद्याला जीआय मिळवून देण्यासाठी जीएमसीसी संस्था प्रयत्न करणार आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com