शेतकऱ्यांना तातडीने मदत द्याः देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टी-बोंड अळीमुळे कापूस-सोयाबीनचे नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही.
devendra Fadnavis
devendra Fadnavis

मुंबई : अतिवृष्टी-बोंड अळीमुळे कापूस-सोयाबीनचे नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही. शेतीमाल खरेदीसुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. पत्रात श्री. फडणवीस म्हणतात, की बोंड अळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे नुकसान झालेले आहे. आताच्या अंदाजानुसार ५० टक्क्यांवर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. बोंडअळीने कापूस नष्ट झाला. बोंडसडीत वरून बोंड चांगले दिसत असले, तरी ते फोडताच कापूस सडलेला असतो. यंदा बोंडसडीचा प्रकार सर्वत्र आढळून येतो आहे. साधारणत: एकरी ६ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी १ क्विंटल आणि फार कमी ठिकाणी २ क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे.  अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळ जवळ ८० टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले, तरी त्याचा कोणता फायदा होईल, अशी स्थिती आहे. अतिवृष्टिग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

बाजारात शेतकऱ्यांची लूट शेतीमालाच्या खरेदीला अजून प्रारंभ झालेला नाही. ओलसर कापसाला खासगी व्यापारी भाव देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होते आहे. सोयाबीनसुद्धा ओला असल्याने ३००० रुपयांपेक्षा कमीच भाव मिळत आहे. त्यामुळे खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी भरडला जातो आहे. सुमारे ८ लाख हेक्टरहून अधिक नुकसान असताना प्रत्यक्षात शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही, अशी स्थिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये सुद्धा ५० टक्केच शेतीमालाची आवक होत असल्याची स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, हे स्पष्टच आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com