जागतिक सोयाबीन  उत्पादन, वापर वाढणार

जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचे उत्पादन आणि वापर वाढणार असून, पुढील हंगामासाठी शिल्लक साठा कमीच राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी खात्याने (यूएसडीए) व्यक्त केला आहे. भारतात सोयापेंडचे उत्पादन आणि वापर वाढेल.
जागतिक सोयाबीन  उत्पादन, वापर वाढणार
Global soybeans Production, consumption will increase

पुणे ः जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचे उत्पादन आणि वापर वाढणार असून, पुढील हंगामासाठी शिल्लक साठा कमीच राहील, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी खात्याने (यूएसडीए) व्यक्त केला आहे. भारतात सोयापेंडचे उत्पादन आणि वापर वाढेल, तसेच ब्राझील आणि अर्जेंटिनात उत्पादनात घट होईल, असेही यूएसडीने आपल्या अहवालात म्हटले आहे.  जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचे उत्पादन ३७२५ लाख टनांवर होईल, मागील हंगामात ३६६२ लाख टन उत्पादन होते. तर वापर ३१५५ लाख टनांपासून ३२५७ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. ब्राझील, अर्जेंटिना आणि पेरुग्वे देशात उत्पादन घटणार असल्याने जागतिक सोयाबीन उत्पादनात ९५ लाख टन घट होण्याचा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. दक्षिण ब्राझीलमध्ये डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीपासून दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादनात ५० लाख टनांची घट होऊन १३९० लाख टनांवर पोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र येथील काही संस्थांच्या मते ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन १३३४ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच अर्जेंटिनामध्येही लागवड आणि उत्पादकता घटल्याने उत्पादन ३० लाख टनांनी कमी होऊन ४६५ लाख टनांपर्यंत होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम अर्जेंटिनाच्या सोयाबीन गाळप आणि सोयापेंड तसेच सोयातेल निर्यातीत घट होणार आहे. पेरुग्वे देशात उत्पादन १५ लाख टनांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  यूएसडीच्या अहवालानुसार अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादन १२०८ टन होण्याची शक्यता आहे. यंदा अमेरिकेतील लोवा आणि इंडियाना राज्यात सोयाबीन उत्पादन १०० लाख टनांनी वाढण्याची शक्यता आहे. तर उत्पादकता १.३९ टन प्रति एकर राहण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर पुरवठा टाइट राहण्याची शक्यता असल्याने सोयीबीनचे दर १२.६० डॉलर प्रति बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. एक बुशेल्स म्हणजेच २७.२१६ किलो सोयाबीन. तसेच सोयापेंडचे दर ३७५ डॉलर प्रति शॉर्ट टन राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

कशी राहील आयात-निर्यात जागतिक पातळीवरील सोयाबीन निर्यातीचा विचार करता ब्राझीलची निर्यात यंदा वाढून ९४० लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये ८१६ टन सोयाबीन निर्यात झाली होती. तर अर्जेंटिनाची निर्यात गेल्या हंगामात ५१.९ लाख टन होती. ती यंदा कमी होऊन ४८.५ लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर आयातीचा विचार करता चीनची आयात यंदा १ हजार टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर गेल्या हंगामात चीनमध्ये ९९७.६ लाख टन सोयाबीन आयात झाली होती. युरोपियन देशांचीही सोयाबीन आयात वाढणार असून, १४९ लाख टनांवर माल येईल. गेल्या हंगामात या देशांत १४७.९ लाख टना सोयाबीन आयात झाली होती. 

सोयापेंडचे उत्पादन वाढणार यूएसडीएच्या मते जागतिक पातळीवर यंदा सोयापेंडचे उत्पादन २५५९ टन होईल. मागील हंगामात उत्पादन २४८१ टनांवर होते. तर वापर गेल्या हंगामातील २४४६ लाख टनांवरून यंदा २५१२ लाख टनांवर पोहोचणार आहे. तर पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा मागील वर्षी १२६ लाख टन होता तो यंदा १२४ लाख टनांवरच स्थिरावेल, असे यूएसडीएने म्हटले आहे.  यूएसडीएने भारतात २०२१-२२ च्या हंगामात ८० लाख टन सोयापेंड निर्मितीचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात ७६ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती. तर यंदा भारतात सोयापेंड वापर वाढणार असल्याचे यूएसडीने म्हटले आहे. गेल्या वर्षी भारतात ६० लाख टन वापर झाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.