द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी; गैरप्रचार नको 

निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन खर्चाच्या आधारे रास्त दर मिळावा, ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने जानेवारीसाठी प्रति किलो ८२ रुपये दराचा निर्णय जाहीर केला.
 द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी; गैरप्रचार नको 
The grape price decision should be implemented; Don't misrepresent

नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन खर्चाच्या आधारे रास्त दर मिळावा, ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने जानेवारीसाठी प्रति किलो ८२ रुपये दराचा निर्णय जाहीर केला. मात्र या बाबत कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.  असे असताना काही निर्यातदार व सर्व्हिस प्रोव्हाईडर यांच्याकडून संघाच्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार होत आहे. या मुद्द्यावर द्राक्ष बागायतदार संघाने त्यांना विश्वासात घेऊन द्राक्ष दरासंबंधी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी; गैरप्रचार नको, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने मांडण्यात आली.            संघाने दर जाहीर केल्यानंतरही दराच्या खाली पाडून खरेदी होत असल्याने संघाचे पदाधिकारी व निर्यात प्रक्रियेत काम करणारे सर्व्हिस प्रोव्हाईडर यांच्यात बुधवारी (ता. १९) रोजी ओझर मिग (ता. निफाड) येथील विभागीय कार्यालयात बैठक संपन्न झाली. मात्र जिल्ह्यात जवळपास २०० हून अधिक सर्व्हिस प्रोव्हाईडर कार्यरत असताना अवघे २० ते २५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीला द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, माजी विभागीय अध्यक्ष व राज्य संचालक रवींद्र बोराडे, संचालक व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, बबनराव भालेराव, सुरेश कळमकर आदीसह द्राक्ष उत्पादक, निर्यातदार उपस्थित होते.  सध्या क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या काही सर्व्हिस प्रोव्हाईडर यांच्याकडून संघाने घेतलेल्या निर्णयाबाबत गैरप्रचार होत असल्याने या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रामुख्याने त्यांना विश्वासात घेत ‘‘तुम्हीही  शेतकऱ्यांची मुले आहात, द्राक्ष उत्पादन, खर्च व मिळणारे दर यांची माहिती आहे,’’ असे सांगून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने काढलेल्या उत्पादन खर्चावर आधारित दर निश्चित करण्याचे या वेळी बैठकीत पटवून देण्यात आले. यावर सर्व्हिस प्रोव्हाईडर यांनी सहमती दर्शवली होती.  उत्पादक व निर्यातदार हे दोन्ही द्राक्ष उद्योगाचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे उत्पादक तोट्यात जाणार नाहीत, त्याच्या खर्चावर आधारित दर मिळावेत व निर्यातदार पण टिकला पाहिजे, अशी अपेक्षा या वेळी मांडण्यात आली, अशी माहिती उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.  बैठकी प्रसंगी काही उपस्थित निर्यातदारांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र उत्पादन खर्च चहूबाजूंनी वाढला असताना त्याचा फटका शेतकऱ्यांना नको, अशी रोखठोक भूमिका या वेळी मांडण्यात आली. 

‘ॲग्रोवन’च्या बातमीची चर्चा  शेतकऱ्यांची द्राक्ष काढणीला आली आहेत. मात्र काही निर्यातदार अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न करीत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’कडे मांडली. या प्रश्नांवर ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून वास्तविकता समोर आणणारे ‘द्राक्ष उत्पादकांची झाली कोंडी’ हे वृत्त प्रकाशित झाले होते. या बाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्याबद्दल ‘ॲग्रोवन’चे आभार मानले.    

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.