द्राक्ष विमा परताव्यावरून शेतकरी नाराज

जिल्ह्यातील वाघृळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या कडवंचीसह इतर गावांमधील द्राक्ष उत्पादकांमध्ये विमा परताव्यावरून प्रचंड नाराजीचा सूर आहे.
grapes damage
grapes damage

जालना: जिल्ह्यातील वाघृळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या कडवंचीसह इतर गावांमधील द्राक्ष उत्पादकांमध्ये विमा परताव्यावरून प्रचंड नाराजीचा सूर आहे. नेमकं कसं गणित करून परताव्याची रक्कम दिली, असा प्रश्‍न द्राक्ष उत्पादकांना पडला आहे. जिल्ह्यातील वाघृळ मंडळाअंतर्गत कडवंची, वरुड, नंदापुरसह जालना जिल्ह्यातील इतर द्राक्ष उत्पादक गावांमधील शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकाचे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९-२० मध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जानेवारी, फेब्रुवारी २०२० मध्ये गारपिटीमुळे तोंडाशी आलेल्या द्राक्ष पीक अनेक ठिकाणी उध्वस्त झाले होते. जिल्ह्यातील जवळपास एक हजार पेक्षा जास्त द्राक्ष बागायतदारांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. परंतु या सर्व बाबींचा विचार करूनही ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लि. ने द्राक्ष विमा मंजूर करण्याची तसदी घेतली नव्हती. त्यामुळे हवालदिल झालेल्या जालना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्यासह शासनस्तरावर पीक विमा परताव्यासाठी न्याय देण्याची मागणी २८ जुलै २०२० रोजी केली होती. त्यावेळी विमा उतरविण्याच्या पावत्याही शेतकऱ्यांनी निवेदनासोबत जोडल्या होत्या.  ११ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात विमा परताव्याची रक्कम जमा होण्याचे मेसेज शेतकऱ्यांना येणे सुरू झाले. परंतु १५ हजार रुपये हेक्टरी भरणाऱ्या शेतकऱ्यांना ४५ हजार रुपये विमा परताव्याची रक्कम प्राप्त झाल्याने नेमका हा विमा परतावा कोणते निकष लावून देण्यात आला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शंभर टक्के नुकसान झाल्यास पूर्ण विमा परतावा मिळणे अपेक्षित होते. गेल्या हंगामात नैसर्गिक आपत्ती सोबतच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला होता. मोठं नुकसान व क्षेत्रही जास्त असताना विमा कंपनीने परतावा देताना पाहिलं काय असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत. प्रतिक्रिया हेक्‍टरी १५ हजार रुपये विमा रक्कम भरली. ज्या बागेचा विमा उतरला त्यातून एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. असे असताना विमा परतावा मात्र केवळ पंचेचाळीस हजार रुपये कोणत्या गणितात बसवून विमा कंपनीने दिला हा मला पडलेला प्रश्न आहे. - चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक तथा सरपंच, कडवंची, जि. जालना

पंधरा हजार रुपये हेक्टरी विमा भरला असताना ४५ हजार १०० रुपये परतावा मिळाला. नुकसान १०० टक्के अन् परतावा मात्र अत्यल्प. तो कोणत्या गणितात बसून दिला. शिवाय जास्त क्षेत्र असलेल्या या भागाला विमा परतावा कमी का.  - गणेश म्हस्के, द्राक्ष उत्पादक, वरुड, जि. जालना.

आई व माझ्या नावे असलेल्या जमिनीतील द्राक्ष पिकाचा दोन हेक्टरचा विमा उतरवला. हेक्‍टरी ४५ हजार रुपये परतावा दिला कसा, हे काही आम्हाला समजेना. - रवींद्र क्षिरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना

 एक एकर द्राक्ष पिकाचा ६१२० रुपये रक्कम भरून विमा उतरला होता. सारंच नुकसान झालं असताना परतावा मात्र केवळ ८ हजार रुपये मिळाला. कमी विमा परतावा मिळण्याचं कारण कळेना. - बाळू पाटील कापसे, द्राक्ष उत्पादक, देळेगव्हाण, ता. जाफराबाद, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com