जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला परवानगी द्या 

पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस घटत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जास्त उत्पादकता असलेल्या कापूस बियाणे शेतकऱ्यांना का दिले जात नाही? असा प्रश्न येथील कापड उद्योगाने पाकिस्तानी सरकारला केला आहे.
जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला परवानगी द्या 
High productivity cotton Allow seeds

पुणेः पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस घटत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जास्त उत्पादकता असलेल्या कापूस बियाणे शेतकऱ्यांना का दिले जात नाही? असा प्रश्न येथील कापड उद्योगाने पाकिस्तानी सरकारला केला आहे. सध्या शेतकरी वापरत असलेल्या कापूस बियाण्याची प्रति एकरी उत्पादकता २.१ मण आहे. पाकिस्तानी एक मण जवळपास ४० किलोंचा असतो. देशातील खासगी कंपन्यांनी १८ मण प्रति एकरी उत्पादकता असलेले बियाणे विकसित केले आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या, अशी मागणी उद्योगाने केली आहे. 

पाकिस्तानी कापड उद्योगाच्या मते खासगी संस्थांकडे निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तापूर्ण कापूस उत्पादन देणारे वाण आहेत. कापसाच्या लांबीनुसार हे बियाणे असल्याने याचा लाभ देशातून कापूस निर्यातीसाठी होईल. पाकिस्तानमध्ये २०२०-२१ मध्ये ५० लाख गाठींची आयात झाली आहे.

या कापसासाठी १४७.९ कोटी डॉलर मोजावे लागले. तर चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांत २२.२ लाख गाठी कापूस आयात झाली असून, जवळपास ८२ कोटी डॉलर मोजावे लागले. यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढल्याने आयात महागली आहे. त्यामुळे आयातदारांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पादकता असलेल्या बियाण्याचा पुरवठा करून देशात उत्पादन वाढविणे शक्य आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक आहे. 

पाकिस्तानमध्ये २०२१-२२च्या हंगामात जेवढ्या क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यापैकी तब्बल ७० ते ८० टक्के क्षेत्रावर अनधिकृत बियाण्याची लागवड झाली आहे. तसेच सरकारनेही लागवडीसाठी ज्या वाणांना परवानगी दिली आहे. त्याचीही उत्पादकता कमीच आहे. तसेच पंजाब सीड काऊंसिलने बियाण्याला परवानगी देताना उच्च उत्पादकतेचा निकष ठेवला नाही. तसेच या बियाण्याच्या कार्यक्षमतेचीही चाचणी केली नाही. परवनगी मिळालेल्या वाणांमध्ये बहुतेक वाणांची उत्पादकता २.१ मणांपर्यंत आहे. तर खासगी कंपन्यांकडे १८ मणापर्यंत उत्पादकता देणारे वाण उपलब्ध आहे, असे पाकिस्तानी कापड उद्योगाने त्यांच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

पाकिस्तानमधील कापसाचे दर  पाकिस्तानध्येही कापसाचे दर तेजीत आहेत. येथे कच्च्या कापसाचे दर प्रति मण ६ हजार ५०० ते ८ हजार ६०० पाकिस्तानी रुपये आहेत. तर रुईचे दर १६ हजार ते २० हजार पाकिस्तानी रुपये प्रति मण आहेत. कापसाबरोबरच सरकी आणि सरकी पेंडच्या दरातही तेजी आहे. कापड उद्योगाच्या मते पाकिस्तानमध्ये यंदा ७५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल. तर कापड उद्योगाची मागणी १७५ लाख गाठींवर पोहचेल. मात्र देशात यंदा ७५ लाख गाठींची आयात होईल, असेही पाकिस्तानी कापड उद्योगाने म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.