'इस्राईलमध्ये अडकलेल्या आजारी शेतकऱ्यास सुखरूप परत आणा'

गजानन वानखेडे
गजानन वानखेडे

पुणे :  कृषी खात्याने इस्राईलमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी नेलेल्या शेतकऱ्यांपैकी गजानन वानखेडे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना विमा कंपनी व राज्य शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे जेरुसलेमच्या रुग्णालयात अडकून पडलेल्या या आजारी शेतकऱ्याला, तसेच त्याच्यासोबत थांबलेल्या शेतकऱ्याला सुखरूप परत आणा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  कृषी विभागाच्या मदतीने विमा कंपन्यांनी पीकविमा योजनेत धुडगूस घातला आहेच, पण वानखेडे प्रकरणाच्या निमित्ताने एका विमा कंपनीची शेतकऱ्यांबाबत असलेली अनास्था बाहेर आली आहे. २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी अशा सात दिवसांच्या इस्त्राईल दौऱ्यासाठी राज्य शासनाच्या अनुदानातून कृषी विभागाने  आपल्या दोन अधिकाऱ्यांसह ५४ शेतकऱ्यांना पाठविले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा भागातील खंडाळा गावात राहणारे श्री. वानखेडे वगळता सर्व शेतकरी गुरुवारी भारतात परतले. मात्र, श्री. वानखेडे न आल्यामुळे त्यांचे कुटुंबीय कासावीस झाले आहेत. वानखेडे यांच्या कुटुंबीयांना धक्का बसण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची माहिती देण्यात आलेली नाही.  पुण्याच्या लाइफलाइन टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स लिमिटेडने कृषी विभागाकडून या दौऱ्याचे कंत्राट मिळवले होते. या ट्रॅव्हल कंपनीने सर्व शेतकऱ्यांच्या नावाने ऑनलाइन विमा खरेदी केला होता. ३६ वर्षाचे श्री. वानखेडे भारतातून २२ फेब्रुवारीला दौऱ्यावर निघालेले असताना ठणठणीत होते. मात्र, विमान प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना छातीत त्रास होऊ लागला, अशी माहिती त्यांच्या बरोबर असलेल्या शेतकऱ्यांनी दिली. सर्व शेतकरी यामुळे अस्वस्थ झाले होते. शेतकरी जेरुसलेम येथे हॉटेलमध्ये उतरल्यानंतर मध्यरात्री श्री. वानखेडे यांना पुन्हा त्रास सुरू झाला. ट्रॅव्हल कंपनीचे संचालक जीवन हेंद्रे, कृषी विभागाचे अधिकारी, श्री. लोखंडे यांनी जेरुसलेमच्या शारी झेडेक मेडिकल सेंटरमध्ये त्यांना दाखल केले.  “तपासणीअंती श्री. वानखेडे यांना अॅन्जिओप्लास्टी सुचविण्यात आली. या वेळी श्री. हेंद्रे व संबंधित विमा कंपनीबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना कॅशलेस विमा सुविधा उपलब्ध असल्याचे ठासून सांगण्यात आले. त्यामुळेच २४ फेब्रुवारीला अॅन्जिओप्लॅस्टी करण्यात आली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  धक्कादायक बाब म्हणजे जेरुसलेम हॉस्पिटलने या विमा कंपनीला श्री. वानखेडे यांचे बिल पाठविताच विमा कंपनीने कानावर हाथ ठेवले. “या शेतकऱ्याचे काय करायचे ते तुम्हीच पाहून घ्या. डायबेटिस असल्याची माहिती या शेतकऱ्याने आधी आम्हाला दिली नाही. त्यामुळे आम्ही काहीही बिल देऊ शकत नाही,’’ असे विमा कंपनीने सांगितल्यानंतर या रुग्ण शेतकऱ्याच्या सोबत असलेले श्री. लोखंडे व श्री. कौठकर हेदेखील हादरले.  हॉस्पिटलने देखील साडेबारा लाखांचे बिल अदा न केल्यामुळे श्री. वानखेडे यांना रुग्णालयातून सोडण्यास नकार दिला. त्यांच्यासोबत श्री. कौठकरदेखील हॉस्पिटलमध्येच थांबलेले आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातील ३६ वर्षांय श्री. वानखेडे यांना, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या श्री. कौठकर यांना आता भारतात कसे परत आणायचे याविषयी इतर शेतकऱ्यांना चिंता लागून आले. त्यांचा इस्त्राईलमधील व्हिसा तीन मार्चपर्यंत कसाबसा वाढविण्यात आलेला आहे.  भारतात परतल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाला जागे कऱण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मदन येरावार, कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना तातडीने या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. “आम्हाला केवळ हमीपत्र दिले तरी आम्ही रुग्णाला सोडू शकतो,` असे रुग्णालयाने सांगितले आहे. मात्र, विमा कंपनी, ट्रॅव्हल कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही. ईस्त्राइलमधील भारतीय दुतावासाला सांगितले असते, तरी या प्रकरणात तातडीने तोडगा निघाला असता, अशी माहिती सहप्रवासी शेतकऱ्यांनी दिली. 

लोखंडे, कौठकर यांनी शेतकऱ्यासाठी दौरा सोडला  गजानन वानखेडे यांना वाचविण्यासाठी नितीन लोखंडे व लक्ष्मीकांत कौठकर यांनी दौरा सोडून दिला. कृषी विभाग किंवा इतर कोणीही त्यांच्या जवळ थांबले नाही. मात्र, श्री. लोखंडे, श्री. कौठकर यांनी दिवसरात्र श्री. वानखेडे यांना सांभाळले. तसेच, विमा कंपनीची कागदपत्रे तयार होण्यासाठी पाठपुरावा केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com