विदर्भाच्या कॅलिफोर्नियात बंदी असतानाही बोअरवेल व्यवसाय जोमात

चोरीछुपे बोअरवेल खोदण्याचा व्यवसाय अमरावती जिल्ह्यात पाय रोवू लागला आहे. त्याकरिता सर्वच पातळ्यांवरील यंत्रणांना मॅनेज केले जात असल्याची धक्‍कादायक माहिती बोअरवेल एजंटने दिली. या भागात पाणी पातळी १३०० फुटापर्यंत खालावल्याचे सांगितले जाते.
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात बंदी असतानाही बोअरवेल व्यवसाय जोमात
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात बंदी असतानाही बोअरवेल व्यवसाय जोमात

अमरावती : जलपुनर्भरण, जलसंवर्धनाच्या कामांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे वरुड, मोर्शी हा संत्रा पट्टाच ड्रायझोनचा शाप भोगत आहे. तब्बल ८० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक संत्रा लागवड असलेल्या या जिल्ह्यातच २००२ पासून बोअरवेल आणि विहीर खोदण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र संत्रा उत्पादकांची गरज लक्षात घेत चोरीछुपे बोअरवेल खोदण्याचा व्यवसाय जिल्ह्यात पाय रोवू लागला आहे. त्याकरिता सर्वच पातळ्यांवरील यंत्रणांना मॅनेज केले जात असल्याची धक्‍कादायक माहिती बोअरवेल एजंटने दिली. या भागात पाणी पातळी १३०० फुटापर्यंत खालावल्याचे सांगितले जाते. नागपुरी संत्र्याखालील सर्वाधिक ८० ते ८५ हजार हेक्‍टर लागवड क्षेत्र वरुड, मोर्शी या दोनच तालुक्‍यात आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असेही म्हटले जाते. याच वरुड तालुक्‍यातील शेंदूरजन घाट परिसरात संत्रा रोपवाटिका व्यवसायही बहरात आला. हजारो व्यक्‍तींच्या हाताला काम देणाऱ्या या व्यवसायातून दरवर्षी लाखो रोपांची विक्री होते आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायाची आहे. प्राथमिक टप्प्यातील संत्रा प्रक्रिया उद्योगांची संख्यादेखील दहावर पोचली आहे. अब्जावधी रुपयांचे अर्थकारण असलेल्या याच जिल्ह्यात दुष्काळी वर्षात संत्रा बागा जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याचे गंभीर वास्तव आहे. गेल्या वर्षी पाण्याची उपलब्धताच न झाल्याने ३३ टक्‍के क्षेत्रावरील बागा जळून गेल्या होत्या. यापूर्वी १९९८-१९९९ मध्ये परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर बोअरवेल खोदण्यात आल्या. परंतु जलपुनर्भरणाकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी पातळी खालावलेली होती. परिणामी एका बोअरवेलमधील धुरळा दुसऱ्या बोअरवेलमधून निघायचा, असे सांगितले जाते. त्यानंतरही उपसा करताना पाणी पातळी वाढण्यासाठी प्रयत्नच झाले नाही. परिणामी आता पाणी पातळी तब्बल १३०० फुटापर्यंत खाली गेली. त्याची दखल घेत वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके ड्रायझोन जाहीर करीत बोअरवेल, विहिरींच्या खोदकामावर बंदी लादण्यात आली. वरुड तालुक्‍यातील बेंबळी प्रकल्पाच्या वर अनेक बोअरवेल पूर्वीच खोदण्यात आले आहेत. दीड किलोमीटरच्या परिसरात ८०० बोअरवेल आहेत. पुनरुज्जीवनाच्या नावावर नवे बोअरवेलही या भागात खोदले आहेत. त्या भागात आता विहिरींनाही पाणी लागत नाही, अशी स्थिती आहे. असे आहेत सिंचन प्रकल्प वरुड तालुक्‍यात उमरी, वाई, सातनूर, पुसला, पंढरी, नागठाणा-१, नागठाणा-२, जटामजरी, बेंबळी, शेकदरी, बहादा, धामनदस, पळसोना, पाक, दाभी असे सिंचन प्रकल्प आहेत. असे आहेत बोअरवेलचे दर बंदी नसलेल्या भागात ९५ रुपये प्रती फुटाचा दर आहे. ड्रायझोनमध्ये मात्र रिस्क असल्याने ११० ते १२० रुपयांचा दर आकारला जातो. शेतकऱ्यांकडून १५५ ते १६० रुपये एजंट घेतात, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर कारवाई करणाऱ्या यंत्रणांना मॅनेज करण्याचे आव्हान राहते. त्यावर मोठा खर्च होतो. गेल्या वर्षी २५ यंत्रे चालू होती. रात्रभर खोदकाम करायचे आणि दिवस उजाडताच या मशिन गायब केल्या जातात, असेही एजंटने सांगितले. प्रतिक्रिया... मी ड्रायझोनमधील जमिनीचा शास्त्रोक्‍त अभ्यास केला. त्या वेळी उपसा अधिक होत गेला आणि पुनर्भरण कमी झाल्याचे दिसून आले. त्याआधारे मी काही शिफारशी पण केल्या; त्यामध्ये भूजल पातळी अधिक खालावलेल्या भागात तलाव घेतल्यास त्यात पावसाचे पाणी साचून ते जमिनीत झिरपत पाणी पातळी वाढेल, असे म्हटले. पाऊस जास्त झाला तरी सुद्धा पातळी वाढते. - प्रदीप देशमुख, टेंभूरखेडा, ता. वरुड, जि. अमरावती

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात जलसंधारणाची कामे सर्वाधिक झाली. यात सातत्य राहिल्यास ड्रायझोनचा शाप निघू शकतो. संत्र्यांसाठी सक्‍तीचे ठिबक आणि त्याकरिता सरसकट ८० टक्‍के अनुदान देण्याचे धोरण राबविले तर फायदा होणार आहे. - डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री

जलजीवन, जलयुक्‍त तसेच आता इतर योजनांमधून या भागात जलसंधारणाची कामे करून पाणी पातळी वाढविण्यात सातत्य राखण्यात आले आहे. त्याचा काही अंशी फायदादेखील होत असला तरी शेतकरीदेखील जागरूक झाले आहेत. नवीन संत्रा बाग करणारे सारेच ठिबकचा अवलंब करतात. ही समाधानाची बाब आहे. या भागात अनधिकृत बोअरवेल घेतले जाऊ नये याकरिता महसूलचे पथक नेहमी दक्ष राहते. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com