इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार 

जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने पामतेलाला फोडणी मिळाली आहे. पामतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने इंडोनेशिया पामतेल निर्यात कमी करण्याच्या विचारात आहे.
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार 
Indonesia will win Will reduce exports

पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने पामतेलाला फोडणी मिळाली आहे. पामतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने इंडोनेशिया पामतेल निर्यात कमी करण्याच्या विचारात आहे. याचा परिणाम भारताच्या खाद्यतेल आयातीवर होऊ शकतो. इंडोनेशियाने पामतेल निर्यात कमी केल्यास भारत मलेशियाकडून आयात वाढवू शकतो. मात्र मलेशियाकडून भारताची मागणी पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताला सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाकडे वळावे लागेल, असे उद्योगातील जाणकारांनी सांगितले.  भारत इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेल आयात करतो. तर ब्राझील आणि अर्जेंटिनातून सोयाबीन तेल देशात दाखल होते. तर रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफुल तेलाची आयात केली जाते. सध्याच्या खाद्यतेलाचा विचार करता सूर्यफूल तेलाचे दर आकर्षक वाटत आहेत. मात्र रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे सूर्यफूल तेल आयात वाढविणे शक्य नाही, असे जाणकारांनी सांगितले.  भारत वार्षिक २२५ लाख टन गरजेपैकी तब्बल १३० ते १५० लाख टन खाद्यतेल आयात करतो. त्यातच एकूण आयातीपैकी जवळपास ७० टक्के पामतेलाची आयात होते. देशात दाखल होणाऱ्या एकूण पामतेलापैकी तब्बल ६० टक्के तेल इंडोनेशियातून येते. तर उर्वरित ४० टक्के पामतेल मलेशियातून आयात केले जाते. या वरूनच इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर किती दूरगामी परिणाम होईल, याची कल्पना येते. मात्र २०२१ मध्ये खाद्यतेलांच्या दरात तेजी आली. पामतेलाचेही दर विक्रमी पातळीवर पोहोचले. इंडोनेशियात पामतेलाचे दर ५ हजार २२८ रिंगीट म्हणजेच १ हजार २४८ डॉलर प्रति टनांवर पोहोचले. पामतेलाच्या दराचा भडका उडाल्याने इंडोनेशियालाही याचा फटका बसतोय. स्थानिक नागरिकांनाही झळ बसत असल्याने इंडोनेशिया सरकराने पामतेल निर्यात कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.  भारताने इंडोनेशियाकडून पामतेल आयात कमी केल्यास दर कमी होतील, असे भारतीय आयातदारांनी सांगितले. मात्र पामतेलासोबतच सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचेही दर वाढले आहेत. सध्या पामतेल आणि सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या दरातील तफावत कमी झाली आहे. त्यामुळे भारतीय खरेदीदार सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाकडे वळतील, असे जाणकारांनी सांगितले. 

दरातील तफावत कमी झाल्याने  सोयाबीन, सूर्यफूल तेलाला पसंती  सध्या फ्रेब्रुवारीच्या शिपमेंटसाठी विमा आणि फ्रेटच्या खर्चासह पामतेल प्रति टन १ हजार ४१० डॉलर प्रति टनाने मिळत आहे. तर कच्चे सोयाबीन तेल १ हजार ४५० डॉलर प्रति टन आणि सूर्यफूलाचे कच्चे तेल १ हजार ४२० डॉलर प्रति टनाने मिळत आहे. सध्या पामतेल आणि सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या दरातील तफावत ४० आणि १० डॉलर प्रति टन आहे. जी गेल्या वर्षी १०० डॉलर प्रति टनांवर होती. दरातील तफावत कमी झाल्यामुळे आयातदारांनी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीला पसंती दिली आहे. 

आयातीसाठी लागतो विलंब  सोयाबीन आणि सूर्यफूलाची आयात वाढत असली तरी प्रत्यक्ष शिपमेंट दाखल व्हायला विलंब लागतो आहे. आयातीचे करार झाल्यानंतर देशात पामतेल दाखल व्हायला तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र सोयाबीन आणि सूर्यफूल तेल निर्यात करणारे देशांचे अंतर दूर असल्याने दोन महिने लागतात. 

प्रतिक्रिया 

पामतेलाचा भारत मोठा ग्राहक आहे. इंडोनेशिया पामतेलाची निर्यात बंद करणार नाही. तर कच्च्या तेलाची निर्यात कमी करून रिफाइंड तेलाची निर्यात वाढविणार आहे. देशात पामतेल आयात कमी झाली तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा पर्याय आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा भारतावर परिणाम होईल, असे वाटत नाही. परंतु देशातील रिफानरी उद्योग चालावा यासाठी रिफाइंमड तेल आयातीला आमचा विरोध आहे. कच्चे पामतेल आयात करावे.  -भारत मेहता, कार्यकारी संचालक, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.