जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी

तपासणी कृषी यंत्रणांनी सुरू केली आहे. ही तपासणी पूर्वहंगामी कापूस लागवड आटोपल्यानंतर सुरू झाल्याने कृषी विभागाला उशिरा शहाणपण सुचल्याचा मुद्दाही उपस्थित होत आहे.
Inspection of agricultural centers in Jalgaon district
Inspection of agricultural centers in Jalgaon district

जळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा, विक्री व इतर बाबींची तपासणी कृषी यंत्रणांनी सुरू केली आहे. ही तपासणी पूर्वहंगामी कापूस लागवड आटोपल्यानंतर सुरू झाल्याने कृषी विभागाला उशिरा शहाणपण सुचल्याचा मुद्दाही उपस्थित होत आहे. 

जिल्ह्यात चोपडा, यावल व इतर भागांत कापसाच्या अवैध बियाण्याची मोठी विक्री झाली. चोपड्यात हा प्रकार अधिक होता. याची चर्चा सर्वत्र होती, पण तपासणी त्या वेळेस केली नाही. फक्त तीनच कारवाया कापूस अवैध बियाण्यासंबंधी झाल्या. या कारवायादेखील अवैध बियाणे विक्री बऱ्यापैकी आटोपल्यानंतर झाल्या. यामुळे अवैध बियाणे विक्रीबाबत केलेल्या दुर्लक्षाचा मुद्दाही उपस्थित होत आहे. अशात जळगाव व इतर तालुक्यांत कृषी केंद्रांची तपासणी कृषी यंत्रणांनी नुकतीच सुरू केली आहे. त्यात साठा, विक्री याची माहिती घेतली जात आहे. 

कृषी केंद्रांमध्ये कुठेही गैरप्रकार आढळल्याची माहिती अद्याप कृषी विभागाने जारी केलेली नाही. सोयाबीन बियाण्याबाबत मात्र कृषी केंद्रचालकांना कुठलीही विचारणा केली जात नसल्याची माहिती आहे. सोयाबीन बियाण्याची मोठी टंचाई आहे. सोयाबीन उत्पादनच हवे तसे नसल्याने ही स्थिती आहे. परंतु ही समस्या मिटविण्यासह या बियाण्याबाबत कृषी केंद्रचालक, शेतकऱ्यांच्या अडचणी काय, याची पडताळणीदेखील केली जात नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे १२५० कृषी केंद्र आहेत. या केंद्रांची तपासणी लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती आहे. 

युरियाच्या समस्येबाबतही प्रशासनाने खत विक्रेते, पुरवठादार कंपन्यांची बैठक बोलावून तोडगा काढावा. कारण असाच प्रकार सुरू राहिला तर युरिया टंचाई यंदाही वाढेल व शेतकऱ्यांची अडवणूक होईल, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत. युरियाचा गेल्या १० दिवसांत सुमारे पाच हजार टन पुरवठा झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढा पुरवठा झाला, तरीदेखील टंचाई का सांगितली जाते, बाजारात शेतकऱ्यांना युरिया पुरेसा का मिळत नाही, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com