पुढील हंगामात साखर उत्पादनात घटः इस्माचा अंदाज

साखर उत्पादन
साखर उत्पादन

नवी दिल्ली: देशातील ऊस उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने लागवड घटली आहे. परिणामी, साखर उत्पादनात १४ टक्के घट होऊन यंदाच्या ३२९ लाख टनांवरून २०१९-२०च्या (आॅक्टो-सप्टें) गाळप हंगामात २८२ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तसेच यंदा २०१८-१९ मध्ये साखर उत्पादन गेल्या हंगामातील ३३० लाख टनांवरून ३२९ लाख टनांवर आले आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) हंगामाच्या पहिल्या अंदाजात दिली.  ऊस उत्पादनाचा प्रारंभिक किंवा पहिला अंदाज हा पावसाचा अंदाज आणि अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असतो, असे ‘इस्मा’ने म्हटले आहे. २०१८-१९ च्या हंगामात देशातील महत्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अनेक भागांत दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड शक्य झाली नाही. ‘इस्मा’च्या अंदाजानुसार २०१९-२० मध्ये (जून-जुलै) ४९ लाख हेक्टरवर ऊस लागवड होईल, २०१८-१९ मध्ये ५५ लाख हेक्टरवर ऊस होता.   महाराष्ट्रात ३७ लाख टनांनी साखर उत्पादन घटणार  २०१८ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची स्थिती होती. भूजलपातळीत झालेली मोठी घट, जलाशयांमधील पाणीसाठ्यातील घट, विहिरींना गाठलेला तळ आणि उन्हाचा चटका यामुळे ऊस पिकाला मोठा फटका बसला. एकूण १५ महिने चालणाऱ्या ऊस पिकाला पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडी थांबवल्या आणि असलेल्या उसाचे मोठे क्षेत्र पाण्याअभावी करपले. त्यामुले येणाऱ्या गाळप हंगामात ऊस कमी क्षेत्रावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यंदा असलेले ११.५ लाख हेक्टरवरील ऊस पीक पुढील हंगामात ८.२३ लाख हेक्टरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादनात ३७ लाख टनांनी घट होणार आहे. यंदा १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र पुढील हंगामात केवळ ७० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे.  कर्नाटकात २० टक्के घट शक्य कर्नाटक राज्यातील काही भागांत दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. राज्यात ऊस क्षेत्र यंदाच्या ४.२ लाख हेक्टरवरून ८२ हजारावर आले आहे. त्यामुळे साखर उत्पादनातही २० टक्के घट होऊन ३५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूत साखर उत्पादन यंदाच्या ८ लाख ६० हजार टनांवरून पुढील हंगामात ७ लाख ५० हजार टन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘इस्मा’ने दिली. उत्तर प्रदेशात उत्पादन स्थिर राहील ‘इस्मा’ने म्हटले आहे, की साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षीएवढेच म्हणजेच १२० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा ११८.२ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. मात्र ऊस लागवडीखालील क्षेत्र यंदाच्या तुलनेत कमी होणार आहे. यंदा २४.१ लाख हेक्टरवर ऊस होता मात्र पुढील हंगामात २३.६ लाख हेक्टरवरच ऊस उपलब्ध होईल.  ‘इस्मा’च्या अहवालातील ठळक मुद्दे

 • दुष्काळी स्थितीमुळे देशात ऊस लागवड घटली  
 • साखर उत्पादनात १४ टक्के घटीचा अंदाज  
 • २०१९-२० मध्ये २८२ लाख टन उत्पादन होणार  
 • उत्तर प्रदेशात १२० लाख टन उत्पादन होईल   महाराष्ट्रातील उत्पादन ७० लाख टनांवर येणार  
 • कर्नाटक, तमिळनाडूतही उत्पादनात घट होईल
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com