कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख 

धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ जाधव व अनिल जाधव या दोन शेतकरी भावंडांनी चक्क टुमदार देखण्या बंगल्यावरच दीडशे किलोच्या भव्य कांद्याचा प्रतिकृती उभारून कृतज्ञतेचा वेगळा आदर्श उभा केला आहे.
 कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख 
Kandach banla tumdar bangalyachi okh

नाशिक ः 

या नभाने या भुईला दान द्यावे  आणि माझ्या पापणीला पूर यावे..!  गुंतलेले प्राण या रानात माझे  फाटकी ही झोपडी काळीज माझे..!  कवी ना. धों. महानोरांनी अतिशय समर्पक शब्दांत शेतकऱ्याचं शेती-मातीच्या आणि झोपडीच्या नात्याचं वर्णन केलं आहे. शेतकऱ्यांच्या मनात वाटणाऱ्या याच काव्यपंक्तीची प्रचिती येते येवल्यातील धनकवाडी या गावात...! काळ्या मातीत पिकवलेल्या कांद्याच्या पिकाचं सोनं झालं आणि त्या सोन्यातून टुमदार बंगला उभा राहिला म्हणून या बंगल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ जाधव व अनिल जाधव या दोन शेतकरी भावंडांनी चक्क टुमदार देखण्या बंगल्यावरच दीडशे किलोच्या भव्य कांद्याचा प्रतिकृती उभारून कृतज्ञतेचा वेगळा आदर्श उभा केला आहे.  तालुक्यातील धनकवाडी येथील साईनाथ जाधव व अनिल जाधव या तरुण तडफदार युवा शेतकऱ्यांनी शेतात पिकलेल्या कांद्याने भरभरून दान दिले अन् यातूनच टुमदार बंगला साकारल्याने कांदा पिकाविषयी ही अनोखी उतराई केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांनी अगदी ५० रुपये क्विंटल रुपये दराने कांदा विक्री केला. पण गेल्या वीस-पंचवीस वर्षात कांद्यावरची भक्ती मात्र कधीही ढळू दिली नाही. म्हणूनच गेल्या तीन-चार वर्षांत याच कांद्याने शेतकऱ्यांची झोपडी मोडीत काढून बांधावर टुमदार बंगले उभे करण्याचा योग जुळवून आणला आहे.  जाधव भावंडांच्या शेतातही कांदा पिकतो. कधी तो नफ्यात विकतो, तर कधी तोट्यातही; परंतु हाच कांदा आपल्या श्रमाचे मोल जाणवेल, असा विश्‍वास ठेवत त्यांनी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने दरवर्षीच कांद्याला प्राधान्य दिले. मागील वर्षी त्यांना नशिबाची साथ मिळाली आणि सुमारे दहा एकरांत पिकवलेल्या कांद्याला भावही चांगला मिळाला. परिणामी, खर्च वजा जाता त्यांच्या हातात बारा ते पंधरा लाख रुपये शिल्लक राहिल्याने, आता या पैशात शेताच्या बांधावर टुमदार बंगला बांधावा हा संकल्प त्यांनी केला. बंगला पूर्णही झाला; पण मनोमन ज्या कांद्याने आपल्यावर ही माया केली, त्याची उतराई केली पाहिजे, या विचारातून या दोघा बंधूंनी घराच्या शेतावर कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला. 

प्रतिकृती बनविण्यासाठी १८ हजारांचा खर्च  लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याची प्रतिकृती पाहण्यात आली आणि त्यांच्या निश्‍चयाला बळ मिळाले. या पद्धतीनेच त्यांनी घरावर सर्वांना दुरून दिसेल, अशी भव्य प्रतिकृती उभी केली आहे. यासाठी त्यांना सुमारे १८ हजारांपर्यंत खर्चही आला आहे. मात्र अठरा हजारांपेक्षा ज्या पिकाने आपल्याला तारले, त्याची आपण उतराई करू शकलो याचा मोठा आनंद असल्याचे जाधव बंधू सांगतात. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक जण फक्त बंगल्यावरील हा कांदा पाहण्यासाठी येथे येत असून, त्यांच्या या निर्णयाचे कौतुकदेखील होत आहे. त्यांचा कांदा चर्चेचा विषय ठरला आहे.  प्रतिक्रिया 

या भागात पाण्याची सोय नसल्यामुळे कोरडवाहू शेती असून, हंगामात कांद्याचे पीक निघते. मागील वर्षी कांद्याने कधी नव्हे अशी साथ दिल्याने बंगल्याचे स्वप्न पूर्ण करू झाले. त्यामुळे या कांद्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी ही प्रतिकृती लावली आहे. कांदे तीनशे रुपये विकले अन् तीन हजार रुपये विकले, तरी हेच पीक आम्ही कायम करत राहणार.  -साईनाथ जाधव, शेतकरी 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com