खेड, संगमेश्‍वर तालुक्यात  विजांच्या कडकडाटासह पाऊस 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सायंकाळी खेड आणि संगमेश्‍वर तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
खेड, संगमेश्‍वर तालुक्यात  विजांच्या कडकडाटासह पाऊस   Khed, in Sangameshwar taluka Rain with thunderstorms
खेड, संगमेश्‍वर तालुक्यात  विजांच्या कडकडाटासह पाऊस   Khed, in Sangameshwar taluka Rain with thunderstorms

रत्नागिरी : हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सायंकाळी खेड आणि संगमेश्‍वर तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वेगवान वारेही वाहत होते. ऐन हंगामात पाऊस झाल्याने आंबा बागायतदार प्रचंड धास्तावले आहेत. गेले काही दिवस तीव्र उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना सायंकाळी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. 

गेले काही दिवस जिल्ह्यात उष्मा वाढला आहे. पारा ३६ अंशापेक्षाही अधिक गेला होता. किमान पाराही २४ अंशापर्यंत राहिल्यामुळे रात्रीच्या वेळी उष्मा जाणवत होता. हवामान विभागानेही ८ मेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण होते. खेड, देवरूखसह संगमेश्‍वरात जोरदार पाऊस सुरु झाला. खेड तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते. तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दुपारनंतर पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

शहरात देखील सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळून हवेत गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यातील अनेक भागात कोसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदार मात्र धास्तावले आहेत. तालुक्यात दर वर्षीपेक्षा यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने बागांच्या मशागतीचा खर्च तरी निघेल का? या चिंतेत शेतकरी असतानाच अवकाळी पावसाने झोडपल्याने आंबा फळांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वादळी वाऱ्याने शहरासह ग्रामीण भागात धुळीचे साम्राज्य पसरले होते. अचानक आलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. देवरूख आणि संगमेश्‍वरमध्येही जोरदार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीजही गायब झाली. मात्र मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. 

सिंधुदुर्गमध्ये घर, गोठ्यांची पडझड 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सायकांळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे काही गावांमध्ये पडझडीचे प्रकार झाले. वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायकांळी चार वाजल्यापासून वैभववाडी, फोंडा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान वैभववाडीत वादळी वारे देखील वाहू लागले. वैभववाडी तालुक्यातील अरूळे, सडुरे, कुर्ली या भागात वाऱ्याचा वेग अधिक होता. त्यामुळे या गावांमध्ये काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. काहीच्या घर, गोठ्यांचे पत्रे वाऱ्याने उडून नुकसान झाले. 

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून वीज वाहिन्या तुटल्या.त्यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा सायकांळी उशिरापर्यंत खंडित होता. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com