खरपुडी कृषी विज्ञान केंद्र राबविणार बीजोत्पादन कार्यक्रम

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे

जालना  : जिल्ह्यातील खरपुडी कृषी विज्ञान केंद्र येत्या खरीप हंगामात तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने अत्याधुनिक सीड प्रोसेसिंग प्लॅंट उभारला असून, कृषी विभागाच्या सहकार्याने ५०० टन क्षमतेच्या वाढीव गोडावूनची सोय केली असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने देण्यात आली. 

खरपुडी येथे शुक्रवारी (ता. ५) कृषी विज्ञान मंडळाचे  २६० व्या मासिक चर्चासत्रात विहीर पुनर्भरण व खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे बीजोत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी भूजल तज्ज्ञ डॉ. पी. एस. कुलकर्णी, तसेच खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे बीजोत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जालनाचे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी एस. ए. गोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तसेच अप्लाइड इनोव्‍हेशन अँड टेक्‍नॉलॉजी ग्रुपच्या प्रिया भोगले व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने आदींची उपस्थिती होती. 

खरपुडी कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत सीड हब प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत झाला आहे. त्याअंतर्गत संपर्क शेतकऱ्यांच्या मदतीने पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम मर्यादित क्षेत्रात राबविला जात आहे हे विशेष. एस. व्ही. सोनुने यांनी प्रास्ताविकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग व पाण्याचे नियोजन करून दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्याचे आवाहन केले.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी विहीर पुनर्भरण आवश्‍यक आहे. विहीर खोदण्याची स्पर्धा परंतु भूगर्भातील पाणी वाढविण्यासाठीही शेतकऱ्यांनी नियोजन करावे. अपेक्षेइतके पर्जन्यमान होत नाही त्यामुळे कायम पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. परिसरातील जमिनीच्या खडकांचा अभ्यास करून गावच्या शिवारातील भूगर्भामध्ये पाणीसाठ्याचा अभ्यास करून पुनर्भरण राबवावे. प्रिया भोगले यांनी, शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या सामू, क्षारता, आर्द्रता व जमिनीचे तापमान तपासण्याचे नरेंद्र या नावाचे नवीन उपकरणाची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी सकारात्मक व मेहनती आहेत. जिल्हा ठिबक सिंचनमध्ये राज्यात प्रथम आहे. कापूस पिकात काम करण्याची गरज आहे. सोयाबीनमध्ये कामाची गरज व क्षेत्र वाढविण्याची आवश्‍यकता आहे. सोयाबीन बीबीएफ तंत्रज्ञानाने लागवड करणार, प्रत्येक गावात ५० हे.क्षेत्र होणे आवश्‍यक आहे. दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.

एस. ए. गोंडगे म्हणाले, विद्यापीठाचे संशोधित चांगले वाण शुद्ध स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे हे बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे काम आहे. बीजोत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीजोत्पादक कार्यक्रमात सहभागी व्हावे. बीजोत्पादनाचा २० ते २५ टक्के अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन राहुल चौधरी, विषय विशेषज्ञ मृदाशास्त्र यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com