दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवास

सातपुड्यातील सावऱ्या दिगर येथील आदिवासींचे रस्त्यांचे व पुलाचे ग्रहण सुटता सुटत नसून पुलाअभावी आजही या भागातील महिला व पुरुषांना नदीमधून चिखल तुडवत जावे लागत आहे.
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवास
Life-threatening journey across the river for grinding

तळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर येथील आदिवासींचे रस्त्यांचे व पुलाचे ग्रहण सुटता सुटत नसून पुलाअभावी आजही या भागातील महिला व पुरुषांना नदीमधून चिखल तुडवत जावे लागत आहे. 

याचा प्रत्यय नुकताच धडगाव तालुक्यातील सावऱ्या दिगर येथील एका ५५ वर्षीय महिलेला दळण दळण्यासाठी बिलगाव येथे नदीमधून जाताना आला. तिचा तोल जाऊन तिच्यासह दळणही पाण्यात पडले. सावऱ्या दिगर व परिसरातील नागरिकांना नियमित दळणासाठी चिखलाची वाट तुडवत बिलगावला जावे लागते. त्यामुळे सुस्त प्रशासन येथील १७ वर्षांपासून रखडलेला पुलाचा प्रश्न कधी मार्गी लावेल, असा प्रश्‍न उपस्थित करून नूतन महिला जिल्हाधिकारी यांनी तरी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

सावऱ्या दिगर येथील सुना फुगदा पावरा ही ५५ वर्षीय महिला आपल्या गावाहून डोक्यावर जवळपास २५ ते ३० किलो धान्य बिलगाव येथे दळण दळणासाठी जात होती. परंतु रस्त्याअभावी ती गावाजवळील नदीमधून चिखल तुडवत जाताना चिखलात तिचा तोल गेला व डोक्यावरील धान्य पाण्यात पडून भिजले. तिच्या सारख्या अनेक स्त्रिया, मुली व पुरुषांना दळण दळणासाठी अशाच प्रकारे नदीमधून चिखल तुडवत बिलगावला जावे लागते. ही परिस्थिती सुस्त सरदार सरोवर प्रशासनामुळे आल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे. 

या गावातील काही पाडे सरदार सरोवरामुळे बुडितात गेल्याने शासनाने त्यांचे पुनर्वसन केले. परंतु इतर पाडे बुडितात जात नाहीत तर पाण्यामुळे टापू होतात. त्यामुळे आमचेही पुनर्वसन करा, अशी मागणी त्यांची आहे. मात्र शासनाने त्यांचे पुनर्वसन नाकारले. त्यात २००५ ला भिंगारे समिती स्थापन केली होती. यातील तज्ज्ञांनी पाहणी करून गावाचे पुनर्वसन न करता दळण वळणासाठी रस्ता व पूल बांधून दिला तर प्रश्‍न सुटेल, असा अहवाल दिला. परंतु १७ वर्षांनंतर अजूनही नदीवर बांधलेला पूल अर्धवटच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.