पुणे जिल्ह्यात हलका पाऊस

कोकण, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात हलका पाऊस Light rain in Pune district
पुणे जिल्ह्यात हलका पाऊस Light rain in Pune district

पुणे : कोकण, मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या आहेत. हवेली, भोर, मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला. मंचर येथे सर्वाधिक ५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्यात जूनपासून पावसाचे प्रमाण कमी-अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा काही प्रमाणात जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडला. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. पश्‍चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी होत असलेल्या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळत आहे. भात पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने पिकांना पावसाची गरज आहे. काही ठिकाणी पाऊस नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.   हवेलीतील भोसरी १४, चिंचवड १८ मिलिमीटर पाऊस पडला. तर कळस, हडपसर, वाघोली, पुणे शहरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. मुळशीतील घोटावडे २० मिलिमीटर, माले ११, तर पौड, थेरगाव, मुठे, पिरंगुट भागात शिडकावा झाला. भोरमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. मावळात तळेगाव ११.६, काले २०, कार्ला २०, लोणावळा १८, शिवणे १२ मिलिमीटर पाऊस पडला. आंबेगावमधील कळंब ३१, पारगाव २०.६३ मिलिमीटर पाऊस झाला. जुन्नरमधील बेल्हा येथे २८, खेडमधील राजगुरूनगर १५, कडूस ११, शिरूरमधील टाकळी ३६, मलठण २० मिलिमीटर पाऊस पडल्याने पिकांना काहीसा दिलासा मिळाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण असल्याने रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

पारनेरमधील पळशीत ढगफुटीसदृश पाऊस नगर : नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी (ता. ७) पहाटे पारनेर तालुक्यातील पळशी शिवारात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने काळू नदीकाठच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनकुटे रस्त्यावरील काळू नदावरील पूल पुराने वाहून गेला आहे. पळशीत १२६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सकाळपर्यंत जिल्ह्यात तीन महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.  पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे, खडकवाडी, ढवळपुरी, पोखरी हा तसा दुर्गम परिसर आहे. शिवारात रात्रीपासून पाऊस सुरू होता. रात्री अकरा वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस पहाटे तीन ते चारवाजेपर्यंत सुरूच होता. अचानक झालेल्या जोरदार पावसाने या भागातून वाहणाऱ्या काळू नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतपिकांचे, भाजीपाला, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. या शिवाय ढवळपुरी ते वनकुटे व पळशी ते वनकुटे या दोन्ही रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले आहेत.  मुसळधार पावसाने या भागातील घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सकाळपर्यंत घारगाव, राहुरी मंडलातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

काढणीला आलेले पीक घरी आणण्यासाठी लगबग सातारा : सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने कमी अधिक स्वरूपात हजेरी लावली आहे. सातारा, महाबळेश्वर, जावली, पाटण, कऱ्हाड तालुक्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. हा पाऊस सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी आदी पिकांना फायदेशीर ठरणार आहे.      महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॅाबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. या पावसामुळे लागवडीवर काहीसा परिणाम होणार आहे. कोरेगाव तालुक्यात घेवडा काढणी, मळणीच्या कामे सुरू आहेत. पाऊस वाढला तर नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची पीक घरी आणण्याची धडपड सुरू आहे. दुष्काळी भागात यंदा चागला पाऊस झाल्याने पिके बहरली आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com