नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामेच नाही

सप्टेंबर महिन्यामध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, ज्या भागामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस (अतिवृष्टी) झाल्याची नोंद झाली आहे, अशाच भागात प्रशासन, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
In many places in Nagar district, there is no panchnama of loss
In many places in Nagar district, there is no panchnama of loss

नगर : सप्टेंबर महिन्यामध्ये सातत्याने झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, ज्या भागामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस (अतिवृष्टी) झाल्याची नोंद झाली आहे, अशाच भागात प्रशासन, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. त्यामुळे भागात सततच्या पावसाने नुकसान होऊनही अतिवृष्टीची नोंद नसलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांचे पंचनामे केले जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे संकट काळात आधार शेतकऱ्यावर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात साधारण पंचवीस दिवस सतत पाऊस सुरू होता. पावसामुळे खरिपातील बाजरी, कापूस, भुईमूग, सोयाबीन, यासह इतर पिकांचे तसेच भाजीपाल्याचे व उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने होऊ लागल्यानंतर लोकप्रतिनिधींनीही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे वारंवार सांगितले.

मात्र, प्रत्यक्षात पंचनामे करण्याचे आदेश ३० सप्टेंबरला स्थानिक पातळीवर निघाले. दरम्यान सहा सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीमध्ये महसूल मंडळांमध्ये ६५ मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस (अतिवृष्टी) झाला आहे, अशाच महसूल मंडळांमध्ये पंचनामे केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. शासनाकडून तसेच प्रशासकीय पातळीवर काढण्यात आलेल्या पत्रात अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, असे स्पष्ट नमूद केले आहे.

तसेच पंतप्रधान पीक विमा योजना, दुष्काळ मूल्यांकनासाठी रब्बी तालुके वर्गीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, गट शेती योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, पंतप्रधान कृषी सिंचाई योजना अंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आदी योजनांचा आढावा घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

आत्माच्या कामकाजाचाही घेतला आढावा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प (आत्मा) च्या कामाचाही आढावा घेतला. आत्माच्य माध्यमातून सुरू असलेल्या शेतीशाळा, कौशल्य आधारित कामे, परंपरागत कृषी विकास योजना, शेतकरी मित्र, तसेच ब्रॅडींग याबाबत आत्माचे प्रकल्प संचालक साबळे यांनी माहिती दिली. यावेळी कृषी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

सरसकट पंचनामे होण्याची गरज आहे. परंतु अतिवृष्टी हा शब्द घालून शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. शासनाने यात बदल करून तातडीने नुकसान झालेल्या सर्वच पिकांची पंचनामे करावेत. - अनिल देठे पाटील, नेते, भूमिपुत्र शेतकरी संघटना

सततच्या पावसाने माझे तीन एकर सोयाबीन पूर्णपणे वाया गेले आहे. इतर अनेक शेतकऱ्याची पिके उद्वस्त झालेत. मात्र, ६५ मिलिमीटरपेक्षा  (अतिवृष्टी) अधिक पाऊस झाल्याची नोंद नसल्याचे सांगून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याला कृषी विभाग टाळाटाळ करत जात आहे. - हेमंत झावरे, शेतकरी, गारगुंडी ता. पारनेर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com