लॉकडाउनमुळे दूध भुकटी विक्री ठप्प 

लॉकडाउनमुळे दुधाबरोबर दूध पावडरच्या विक्रीचे गणित बिघडले आहे. हॉटेल व अन्य व्यवसाय बंद असल्याने दूध भुकटी विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्यातील प्रत्येक दूध संघ व पावडर प्लांटकडे हजारो टन भुकटी पडून आहे.
milk powder
milk powder

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे दुधाबरोबर दूध पावडरच्या विक्रीचे गणित बिघडले आहे. हॉटेल व अन्य व्यवसाय बंद असल्याने दूध भुकटी विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्यातील प्रत्येक दूध संघ व पावडर प्लांटकडे हजारो टन भुकटी पडून आहे.  हॉटेल व अन्य व्यवसाय बंद असल्याने भुकटीची विक्री कशी करावी या चिंतेत दूध संघ आहेत. यातच मागणी नसल्याने दरात ही किलोमागे ४० ते ५० रुपयांनी घट झाली आहे. परिणामी, दूध संघांची चिंता वाढली आहे. लॉकडाउनपूर्वी २५० रुपये किलो असणारा दर आता २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. जानेवारीत दूध भुकटीचे दर वाढले होते. ते मार्चपर्यंत कायम होते. तेथून दर कमी होण्यास प्रारंभ झाला. लॉकडाउनमुळे सभासभारंभ व अन्य कार्यक्रम बंद आहेत. दुग्धजन्य पदार्थांची विक्री याच कारणांसाठी जास्त होते परंतु सर्वत्र निर्बंध आल्याने दुग्धजन्य पदार्थांची विक्री थंडावली आहे.  गेल्या दोन महिन्यांत हजारो टन भुकटी नव्याने तयार करण्यात आली. ग्राहक नसल्याने ही भुकटी संघांच्या गोदामात तशीच पडून आहे. राज्य शासनाने बाजारपेठा पूर्ण खुल्या करण्यासंदर्भात अद्याप कोणतेच निर्देश न दिल्याने पुढील एक-दोन महिन्यांत तरी दुधाच्या पावडरला मागणी कमी राहण्याची शक्यता दूध संघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. जून महिन्याकडून दूध संघाना काही अपेक्षा आहेत. जूनमध्ये जर नियमात शिथिलता आली, बाजारपेठा खुल्या झाल्या तर मेमध्ये तयार झालेली पावडर थोड्याफार प्रमाणात विक्री होऊ शकेल, असे दूध संघ प्रतिनिधींचे म्हणणे आहे.  ऐन उन्हाळ्यात भुकटी करण्याची वेळ  राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंतच दुधाची विक्री होते. कालावधी कमी असल्याने पॅकेज दुधाच्या विक्रीत सरासरी ३० टक्के घट येत आहे. दरवर्षी या कालावधीत दुधाची मागणी वाढते. यामुळे एप्रिल, मे महिन्यांत दूध शिल्लक राहत नाही. परंतु यंदा मात्र उलट स्थिती निर्माण झाली. दररोज लाखो लिटर दूध संघाकडे शिल्लक राहिल्याने दूध संघांनी नुकसान टाळण्यासाठी दुधाची भुकटी तयार करण्याला प्राधान्य दिले. काही संघांनी दुधाचे खरेदी दर कमी करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातील दूध संघांनी मात्र दुधाचे दर कमी न करता त्याची भुकटी तयार करण्याला प्राधान्य दिले.  प्रतिक्रिया  लग्न, सभासमारंभ ठप्प झाल्याने याचा मोठा फटका दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला बसला. यामुळे शिल्लक दुधाची भुकटी व बटर तयार करण्याला आम्ही प्राधान्य दिले. आमची दररोजची पॅकिंग दूध विक्री २७ हजार लिटर इतकी होती ती आता १७ हजार लिटरवर आली आहे. शिल्लक दुधाचे नुकसान टाळण्याकरिता गेल्या दीड महिन्यात साडेचार कोटी रुपयांची पावडर आणि बटर तयार केले. भविष्यात मागणी पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे.  - महावीर पाटील, व्यवस्थापकीय संचालक, स्वाभिमानी दूध संघ 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com