अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीस

agriculture department
agriculture department

कोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम भागात नावीन्यपूर्ण प्रयोग घेणाऱ्या शंभर एकरांतील शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांमधील वादाचा फटका बसला आहे. उन्हाळी नाचणीसाठी पहिल्यांदा युरिया ब्रिकेट्ची शिफारस करून नंतर ती नाकारून ‘आत्मा’च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे.  शेतकऱ्यांनी हा मुद्दा पालकमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे नेला. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत युरिया ब्रिकेट्स द्यावेत, अशी सूचना देऊनही या अधिकाऱ्यांनी युरिया ब्रिकेट देण्यास असमर्थता दाखविली आहे. तुम्ही स्टॅम्पवर स्वत:च्या जबाबदारीवर युरिया ब्रिकेट घेत असल्याचे लिहून द्या, अन्यथा युरिया ब्रिकेटस मिळणार नाहीत, अशी उफराटी सूचना या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. युरिया ब्रिकेटची सुरुवातीला शिफारस करणारे आणि नंतर कोणत्याही कारणाशिवाय शिफारस रद्द करणारे शास्त्रज्ञ व आत्माच्या अधिकाऱ्यांनी मिळून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. तो खपवून घेणार नसल्याचा पवित्रा या भागातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्‍यात गेल्या वर्षीपासून उन्हाळी नाचणीचा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. गेल्या वर्षी या नाचणीसाठी आत्माचे प्रकल्प संचालक व शेंडा पार्क येथील नाचणी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी युरिया ब्रिकेट शिफारस केली. यानुसार शेतकऱ्यांनी त्याचा वापरही केला होता. नाचणीचे पीक चांगले आले. यामुळे यंदाही शंभर एकर क्षेत्रावर हे पीक घेण्यात आले. गेल्या वर्षीप्रमाणे शिफारस कायम ठेवण्यात आली. त्यानुसार युरिया ब्रिकेटची मागणी तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्राकडे नोंदविण्यात आली. पण जानेवारी अखेरीस श्रेयवादावरून आत्माचे अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, शास्त्रज्ञ यांच्यात वाद सुरू झाला. यातून शेतकऱ्यांनाही खालच्या पातळीची भाषा संबंधित शास्त्रज्ञांनी वापरली. या वादातच युरिया ब्रिकेटची मागणी आत्माच्या प्रकल्प संचालकांनी रद्द केली. खताचे व्यवस्थापन वेळीच खते मिळण्याची शक्‍यता धूसर झाल्याने शेतकरी संतप्त बनले. त्यांनी अधिकाऱ्यांना खते देण्यासाठी विनवणी केली. परंतु अधिकाऱ्यांनी नाकारली. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी व मंत्र्यांपर्यंत दाद मागून खते मिळविण्यासाठी धडपड केली. परंतु कोणीच दखल घेत नसल्याचे शेतकरी हतबल झाले आहेत. हा वाद मिटला नसल्याने शंभर एकरांवरील नाचणीचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com