नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर डंका 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सिलरेटरसह ४६ स्टार्टअप्सची राष्ट्रीय पारितोषिक विजेते म्हणून घोषणा झाली.
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर डंका 
Nashikchaya Startupcha National Pativer Danka

नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सिलरेटरसह ४६ स्टार्टअप्सची राष्ट्रीय पारितोषिक विजेते म्हणून घोषणा झाली. त्यामध्ये नाशिकच्या संगणक अभियंता असलेल्या अक्षय दीक्षित याने सुरू केलेल्या कृषी संबंधित ‘वेसाटोगो’ स्टार्टअपचा समावेश आहे. त्यास पाच लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  अक्षयने शेतीच्या अनुषंगाने ‘ग्रामीक’ हे मोबाईल ॲप्लिकेशन आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम’ ही डिजिटलप्रणाली विकसित केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या १० ते १६ जानेवारी दरम्यान पहिल्या स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री यांच्यासमवेत संवादात सहभागी होण्याची संधी अक्षय यांना मिळाली. संवादामध्ये देशभरातील निवडक स्टार्टअप्समधील १७५ प्रतिनिधी उपस्थित होते.  राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२१ साठी २ हजार १०० हून अधिक नामांकने प्राप्त झाली होती. त्यातील १७५ स्पर्धक अंतिम करण्यात आले होते. त्यापैकी ४३ स्टार्टअप्सना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यात कृषी, पशुपालन, पेयजल, शिक्षण आणि कौशल्यविकास, ऊर्जा, उद्योग, तंत्रज्ञान, पर्यावरण, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, आरोग्य, उद्योग, अवकाश, वाहतूक आणि प्रवास या क्षेत्रांचा समावेश होता.  वडील वायू सेनेत असल्याने अक्षय यांची राष्ट्रीय सेवा करण्याची महत्त्वाकांक्षा होती. पण वायू सेनेतील संधी तांत्रिक कारणास्तव हुकली आणि २०१८ मध्ये ‘जय जवान जय विज्ञान' ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून अक्षय यांनी कृषी क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फाउंडेशन आणि नाशिकमधील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अडचणींचा शोध घेतला जात होता. त्यावेळी शेतमाल वाहतूक आणि पुरवठा साखळीतील अडचणी समोर आल्यात. टाटाच्या ‘डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर’च्या माध्यमातून अडचणींवर पर्याय शोधण्यासाठी अभियंत्यांना बोलवण्यात आले. त्यासाठी अक्षय यांनी अर्ज केला होता. अभियांत्रिकीची पदवी पूर्ण होण्याच्या अगोदर ‘वेसाटोगो‘ स्टार्टअपचा जन्म झाला. लागवड ते शेतीमालाचे उत्पादन आणि ते बाजारपेठेपर्यंत नेण्यापर्यंतची साखळी प्रकल्पाचे काम अक्षय यांनी पूर्ण केले. त्यासाठी देशातील ५० तरुणांमध्ये अक्षय आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निवड झाली होती. संशोधन प्रशिक्षक संदीप शिंदे आणि प्रा. सचिन पाचोरकर यांचे मार्गदर्शन त्यांना उपयोगी ठरले.  ६८० कोटींची उलाढाल ‘वेसाटोगा’च्या माध्यमातून ६८० कोटींची उलाढाल झाली आहे.‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या जोडीला आता ओम गायत्री नर्सरी संलग्न झाली असून, ग्रेप मास्टर संलग्न होणार आहे. ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम’शी बारा हजारांहून अधिक शेतकरी जोडले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com