विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे
डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची सोमवारी (ता.२४) बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे अनिल परब यांनी गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजपचे भाई गिरकर यांनी अनुमोदन दिले; तर काँग्रेस आघाडीकडून मांडण्यात आलेला जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी मागे घेतला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. डॉ. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या दुसऱ्या महिला उपसभापती आहेत.

स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी राजकारणातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या म्हणून त्यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू मांडली. विधान परिषदेत त्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सभागृहातही त्यांनी विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता उपसभापती म्हणूनही सभागृहाचे कामकाज उत्तम पद्धतीने हाताळतील आणि जनतेच्या प्रश्नांना योग्य न्याय देतील, अशी अपेक्षा आहे.

माणिकराव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जुलै २०१८ पासून उपसभापतिपद रिक्त होते. विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतिपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणे अपेक्षित आहे, मात्र ही तरतूद स्थगित करण्यासंबंधी संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी सोमवारी सकाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com