नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या गृहजिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड वाणवा तयार झाली आहे.
Nine agricultural assistants have responsibility for 104 villages
Nine agricultural assistants have responsibility for 104 villages

बुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या गृहजिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड वाणवा तयार झाली आहे. मुख्य शहरांलगतच्या तालुक्यात कर्मचारी, अधिकारी संख्येने अधिक असून दुर्गम भागात कोणीही नोकरी करायला तयार नसल्याने संग्रामपूरसारख्या तालुक्यात सध्या केवळ ९ कृषी सहायक १०४ गावांची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. 

बुलडाणा जिल्हा मुख्यालयापासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या तालुक्यातील शेती समृद्ध आहे. जमीन सुपीक असून, प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असताना कृषी यंत्रणा वर्षानुवर्षे खिळखिळी ठेवली जात असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा फायदा फारसा होताना दिसत नाही. प्रत्येक योजनेचा लक्ष्यांक या ठिकाणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. या तालुक्यात ५० पदे मंजूर आहे. यात कृषी सहायकांची सर्वाधिक २५ पदे आहेत. सध्या येथे १६ पदे भरलेली असली, तरी प्रत्यक्षात फिल्डवर केवळ ९ कृषी सहायक कार्यरत आहेत. 

मंडळ कृषी अधिकाऱ्याचे एक, कृषी पर्यवेक्षकांची पाच, अनुरेखकाची चार, सहायक अधीक्षक एक, कनिष्ठ लिपिक दोन, शिपाई तीन अशी अर्धेअधिक पदे खालीच आहेत. सध्या या कार्यालयांतर्गत कार्यरत कृषी सहायकांपैकी एक सहायक अनधिकृतपणे गैरहजर आहे. एक वैद्यकीय रजा टाकून गेले. एक महिला सहायिका प्रसूती रजेवर तर एक कृषी सहायक बुलडाणा मुख्यालयात डेप्युटेशनवर पाठविलेले आहेत. एकूण भरलेल्या १६ कृषी सहायकांपैकी ११ जण कार्यरत आहेत. प्रत्येक कृषी सहायकांकडे ३ मुख्यालयांचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. ३ कृषी सहायकांकडे तांत्रिक पदभार आहे. परिणामी ९ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारी आहे.

शेतकरी अनभिज्ञ कृषी सहायकांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ते कुठल्याच एका गावात पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. महिन्यातून एखाद-दुसरी भेट देतात. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावाचे कृषी सहायक कोण याचीही माहिती नसते. योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी सहायकांचा शोध घ्यावा लागतो. ज्यांना कृषी सहायक मुख्यालयी मिळतात, ते नशीबवान शेतकरी समजले जातात. कृषी पर्यवेक्षकांअभावी पोकरा, क्रॉपसॅप, महाडीबीटी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, ठिबक-तुषारची मोका तपासणी तसेच कार्यालयीन कामकाज प्रभावित झालेले आहे.

जळगाव-संग्रामपूर कोणालाच नको कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात नेमणूक नको असते. अनेक जण नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर फक्त रुजू होतात आणि दुसऱ्याच दिवशी तेथून बदलीच्या मागे लागतात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात वजन वापरून बदल्या करून घेतात. बदल्यांसाठी दबाव व इतर मार्गांचा वापर केला जातो. परिणामी, संग्रामपूर, जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यांतील कृषी कार्यालये कर्मचाऱ्यांअभावी खिळखिळी झाली आहेत.

लोकप्रतिनिधींचा वापर या दोन तालुक्यांत कर्मचाऱ्यांअभावी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. असे असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांवर दबाव टाकण्यासाठी हे कर्मचारी लोकप्रतिनिधींचा वापर करून घेतात. शिवाय आई-वडिलांचे आजारपण, कौटुंबिक कारणे देऊन झालेल्या बदल्या रद्द करून घेतात. यामुळे या भागातील कर्मचारी संख्या कधीही पूर्ण होऊ शकलेली नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com