गाळप हंगाम
गाळप हंगाम

गाळप परवान्यासाठी आता 'एफआरपी'ची अट

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळवण्यासाठी आता एफआरपीची अट देखील पाळावी लागणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धाडसी निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.   ‘महाराष्ट्र साखर कारखाने क्षेत्र आरक्षण, गाळप नियमन व ऊसपुरवठा कायदा १९८४’ मधील तरतुदींचा आधार घेत साखर आयुक्त गाळप परवाना देतात. गाळप परवाना असल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला धुराडी पेटवता येत नाही. विविध अटी असलेल्या करारनामा केल्यानंतरच प्रत्येक कारखान्याला परवाना मिळतो. करारनाम्यात आधी एफआरपीची अट नव्हती. अर्थात, राज्याच्या ऊसपुरवठा कायद्यात या अटीचा उल्लेख नाही. मात्र, साखर आयुक्तालयाला ही अट टाकणे महत्त्वाचे वाटत होते. त्यासाठी आयुक्तांनीच तोडगा काढला.  “ऊस नियंत्रण आदेश १९६६मध्ये साखर आयुक्तांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत. आयुक्तांना स्वतःच्या कक्षेत हितकारक नियम करता येतील, असे आदेशात नमूद केलेले आहे. याच तरतुदीचा आधार घेत साखर आयुक्तांनी स्वतःचे अधिकार वापरून एफआरपीची अट करारनाम्यात आणली आहे. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करताना या अटीचा उपयोग होऊ शकतो. अट भंग झाल्याचा मुद्दा न्यायालयीन युक्तिवादाच्या वेळी करण्याचा पर्याय यातून मिळेल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  ‘‘ऊस नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांना १४ दिवसांत एफआरपीचे पेमेंट न केल्यास प्रतिवर्षी १५ टक्के व्याज द्यावे लागेल,’’ असे या अटीत म्हटलेले आहे. ‘‘एफआरपी व आरएसएफ (महसुली विभागणी सूत्र) पेमेंट रोखीत न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करावे,’’ असे दुसऱ्या अटीत नमूद केले गेले आहे.  एफआरपी वसुलीसाठी साखर आयुक्तांनी गेल्या हंगामापासून जोरदार पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हजार ५५७ कोटी रुपये मिळाले आहेत. सध्या केवळ तीन टक्के एफआरपी थकीत असली, तरी आयुक्तांनी कारखान्यांचा पिच्छा सोडलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com