देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख

देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक क्रांतीची गरज आहे. त्यासाठी सरकार कोणाचेही असले तरी कृषी संशोधनात स्थिरता देणारे सुस्पष्ट धोरण व दीर्घकालीन आर्थिक तरतूद करावी लागेल.
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख
Dr Deshmukh

पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक क्रांतीची गरज आहे. त्यासाठी सरकार कोणाचेही असले तरी कृषी संशोधनात स्थिरता देणारे सुस्पष्ट धोरण व दीर्घकालीन आर्थिक तरतूद करावी लागेल. अन्यथा पुढील दोन दशकात अन्नधान्याची मोठी समस्या तयार होईल, असा इशारा माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी दिला आहे.   महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या (आयमॅट) वेबसंवाद मालिकेत ‘शाश्वत शेती व पोषण सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. आयमॅटचे सचिव डॉ. रामकृष्ण मुळे, संचालक जयवंत महल्ले तसेच राज्यातील विविध कृषी तंत्रज्ञ, तज्ज्ञ, कृषी अधिकारी व शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. ‘‘२०५० पर्यंत १६५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला तेव्हा ४५० दशलक्ष टन अन्नधान्य लागेल. त्यामुळे जनुकीय व्यवस्थेचा कृषी क्षेत्रात वापर वाढवून ही समस्या दूर करावी लागेल. चुकीच्या धोरणांमुळे भारतीय कृषी संशोधन संस्थांना जनुकीय तंत्रज्ञानापासून दूर ठेवले गेले. त्यामुळे खासगी कंपन्यांवर अवलंबून रहावे लागले आहे. ही चूक सुधारता येईल. सध्या स्वतंत्र भारतातील परावलंबी शेतकरी, असे वर्णन शेतकऱ्याचे करावे लागेल,’’ असे डॉ. देशमुख म्हणाले.  ‘‘कडधान्य संशोधनात दोन दशके मी काम केले. माझा निष्कर्ष असा आहे की शेती दुर्दैवाने शाश्वत नाही. शेतकऱ्यांवर संकटाची मालिका येत असून त्याला आत्महत्या करावी लागते. शेती शाश्वत असती तर त्याला कर्ज काढण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. अर्थात, शेतीला अशाश्वत करण्यास आपण सर्वच जबाबदार आहोत. आपण जमिनीला आजारी पाडली आहे.  १९५० मध्ये ५० दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होते. ते आता सहापट वाढून २९१ दशलक्ष टन झाले आहे. हरितक्रांतीमुळे हे झाले पण त्यातून काही समस्या देखील निर्माण झाल्या. त्यावर वेळीच उपाय न केल्यामुळे शाश्वत होत नाही,’’ असे त्यांनी नमूद केले. ‘‘आजच्या शेतीने पर्यावरणाची हानी केली आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. रासायनिक खतांमुळे १८ किलो धान्य तयार होत होते. आता ते सहा किलोवर आले. खतांची नव्हे तर जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. सामाजिक समस्या सोडविण्याबरोबरच अन्नसाखळीत सर्वांना लाभ देणारी, पर्यावरण संसाधनांचे संवर्धन करणारी शेती ही शाश्वत शेती आहे. बॅंका जेव्हा शेतकऱ्यांच्या दारात जाऊन थोडे तरी कर्ज घ्या असे म्हणून लागतील तेव्हा शेती शाश्वत झाली असे मी म्हणेन,’’ असेही डॉ. देशमुख म्हणाले.  

डाॅ देशमुख म्हणाले..

 • शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे कर्जमुक्तीची गरज आहे. 
 • पणन व्यवस्था शेतकरीभिमूख हवी
 • रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर करावा
 • शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन 
 • मध्यस्थ, पुरवठादार व्यवस्थाही महत्वाची
 • माती निर्मितीच्या वेगापेक्षा वीसपट वेगाने धूप होतेय
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com