
पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढवली आहे. येत्या २४ जानेवारीपर्यंत जे कर भरतील त्या प्रत्येक करदात्याला घोणशेत ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश खरमारे यांच्याकडून आकर्षक बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २४ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जे खातेदार १०० टक्के कराचा भरणा करतील, त्या सर्वांची नावे चिठ्ठीत लिहून लकी ड्रॉ पद्धतीने एक चिठ्ठी काढण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचे नाव २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जाहीर करून रोख रक्कम दहा हजार रुपये वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे. घोणशेत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील थकीतकरांचा आकडा जवळपास १५ लाखांच्या घरात आहे. याचा परिणाम विकास कामावर होत आहे. थकीत कराचा आकडा वर्षानुवर्षे वाढत असून, वेळोवेळी नोटीस देऊनदेखील अपेक्षित वसुली झाली नाही. यामध्ये ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होऊन कर बुडवेगिरीला एकप्रकारे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल आणि नियमित कर भरणाऱ्या करदात्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे थकीत आणि नियमित कर भरणाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण बक्षीस संकल्पना राबवण्याचा विचार सरपंच अंकुश खरमारे यांनी केला आहे. ही संकल्पना राबविण्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आले. जबरदस्ती अथवा जप्तीच्या मार्गाने थकीत कर वसुली करण्याऐवजी एका वेगळ्या संकल्पनेचा उपयोग करून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. गावाचा विकास करण्यासाठी ही वसुली होणे आवश्यक आहे. गावातील लोकांनी २४ जानेवारीपूर्वी सर्व कर भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
‘‘गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असणाऱ्या ग्रामपंचायत कराचा आकडा मोठा आहे. याचा विकास कामावर खूप मोठा परिणाम होत आहे. गावातील करदात्यांना वेळोवेळी सूचना देऊन प्रसंगी दंडात्मक कारवाई करून देखील अपेक्षित वसुली झालेली नाही. शिवाय यामध्ये अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊन काही वेळा वादाचे प्रसंग देखील निर्माण झाले आहेत, असे प्रसंग भविष्यात निर्माण होऊ नयेत म्हणून मी ही नावीन्यपूर्ण संकल्पना सुरू केली आहे. याचा करवसुली नक्कीच फायदा होईल.’’ - अंकुश खरमारे, सरपंच, घोणशेत, ता. मावळ, पुणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.