दहा टनांमागे घेतली जाते एक टनाची काट 

संत्रा क्‍लस्टर, सिट्रसनेट असे निर्यातीसाठीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. परंतु या पर्यायाचा वापर करण्याविषयीची जागृती शेतकऱ्यांमध्ये करण्यात आली नाही.
nagpur orange
nagpur orange

नागपूर ः संत्रा क्‍लस्टर, सिट्रसनेट असे निर्यातीसाठीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. परंतु या पर्यायाचा वापर करण्याविषयीची जागृती शेतकऱ्यांमध्ये करण्यात आली नाही. शासनाची ही उदासीनता संत्रा उत्पादकांना मारक ठरली आहे. त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील चार ते पाच बाजार समित्यांमध्ये संत्रा खरेदी होतो. परंतु या ठिकाणीदेखील संत्रा ग्रेडिंग आणि कोटिंगची सुविधा नसल्याने एकाच ग्रेडमध्ये संत्र्याला दर दिला जातो. या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या लुटीचे अव्याहत सत्र सुरू आहे. कळमणा बाजार समितीत तर दहा टनांमागे एक टन संत्रा काट (विना मोबदला) घेतला जातो. 

नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. त्यानंतरही अमरावती जिल्ह्याच्या तुलनेत या जिल्ह्यात संत्रा लागवड क्षेत्र कमी आहे. अमरावती जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये संत्र्यांचे व्यवहार होत नाहीत तर नागपूर जिल्ह्यात खासगी मंडीऐवजी बाजार समित्यांनाच संत्रा विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. काटोल, सावरगाव, कळमेश्‍वर, नरखेड, कळमणा या बाजार समित्यांमध्ये संत्रा खरेदी होतो. परंतु दुर्दैवाने या सर्वच बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंग, कोटिंगची सुविधा नाही. 

कळमणा बाजार समितीचे मार्गदर्शक असताना विद्यमान पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पणनचे अधिकारी तसेच महाऑरेंज प्रतिनिधींच्या उपस्थितीत अशाप्रकारची सुविधा उभारण्यावर एकमत झाले होते. याला वर्षभरापेक्षा अधिकचा कालावधी लोटला परंतु ग्रेडिंग, कोटिंग प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेचे देखील संत्रा उत्पादक बळी ठरत आहेत. 

ग्रेडिंग, कोटिंग यंत्रणा नसल्याने संत्रा खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून काट घेतला जातो. प्रती टन १०० किलो प्रमाणे व्यापारी संत्रा मोफत घेतात. दहा टनांमागे प्रती एक टन, याप्रमाणे व्यापारी निःशुल्क संत्रा घेतात. बारीक खराब संत्रा निघाल्यास आमचे नुकसान होते, असे कारण व्यापाऱ्यांकडून या मागे दिले जाते. या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या लुटीचे अव्याहत सत्र सुरू आहे. कळमणा बाजार समितीत ही लूट सर्रास होते. परंतु त्यावर नियंत्रणासाठी गेल्या अनेक दशकांत शासन पातळीवरून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.  प्रतिक्रिया... नागपूर संत्रा उत्पादक पट्टा असला, तरी येथील बाजार समित्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील ग्रेडिंग, कोटिंगची देखील सुविधा नाही. परिणामी, बाजारात संत्रा नेल्यावर व्यापारी त्यामध्ये कमी दर्जाचा आणि लहान आकाराचा संत्रा असल्याचे सांगत प्रति टन १०० किलो काट घेतात. काही वेळा तक्रारी झाल्या परंतु त्याचा काही एक उपयोग होत नसल्यामुळे आता तक्रारीच्या मूडमध्ये देखील शेतकरी नाहीत. परिणामी, व्यापाऱ्यांना आता लुटीची सूटच मिळाली आहे. हंगामात कळमणा बाजार समितीत दहा हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक असते. त्यावरून लुटीचा आकडा किती मोठा असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.  - मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक शेतकरी, काटोल, जि. नागपूर 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com