खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर लागवड

खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे. सुमारे १० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. पीकस्थिती काही भागांत बरी, तर काही भागांत ढगाळ, विषम वातावरणामुळे हवी तशी नाही.
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर लागवड
Onion cultivation on ten thousand hectares in Khandesh

जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे. सुमारे १० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. पीकस्थिती काही भागांत बरी, तर काही भागांत ढगाळ, विषम वातावरणामुळे हवी तशी नाही. 

यंदा लागवड वाढेल, असा अंदाज होता. लागवड १४ हजार हेक्टरवर पोहोचेल, असेही सांगितले जात होते. परंतु लागवड अद्याप सुमारे १० हजार हेक्टरवर झाली आहे. लागवड सुरूच आहे. विजेचा लपंडाव, दिवसा होणारा कमी वीजपुरवठा यामुळे लागवड रखडत सुरू आहे. चार दिवस दिवसा व दोन दिवस रात्री वीजपुरवठा कृषिपंपांना केला जातो. यातच वीज मध्येच बंद होते. कांदा लागवडीच्या वेळेस लागलीच पाटपाणी द्यावे लागते. पाणी दिल्यानंतर मागे लागवड केली जाते. या कामात विजेच्या समस्येने अडचणी येत आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे चार हजार हेक्टरवर, तर धुळ्यात पाच हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. नंदुरबारातही सुमारे ९०० ते १००० हेक्टरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. लागवड आणखी १० ते १२ दिवस सुरू राहील. यामुळे लागवडीचा आकडा वाढेल. सुमारे दोन हजार हेक्टरवर आणखी कांदा लागवड होईल. धुळ्यात शिंदखेडा, साक्री, धुळे तालुक्यांत अधिक कांदा लागवड झाली आहे. 

नंदुरबारात नवापूर, नंदुरबार तालुक्यात अधिकची कांदा लागवड झाली आहे. तर जळगावात यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर, पाचोरा, जळगाव भागात कांदा लागवड अधिक आहे. पिकासाठी निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज आहे. परंतु या महिन्यात सतत ढगाळ, विषम वातावरण तयार होत आहे. मध्येच थंडी वाढते. यामुळे हवी तशी वाढ पिकात नाही. पिकाला संप्रेरके, बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. सध्या थंडी असल्याने हलक्या जमिनीत सिंचन आठवडाभरानंतर करावे लागत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.