कमी दराने कांदा खरेदी सुरूच 

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने सुरू झालेल्या वडांगळी उपबाजार आवारात कांदा लिलावात व्यापाऱ्यांकडून रास्त दराने बोली लागत नसल्याची स्थिती आहे. गत सप्ताहात शेतकऱ्यांनी दर पाडून खरेदीच्या प्रकरणावरून लिलाव बंद पाडले होते.
onion
onion

नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने सुरू झालेल्या वडांगळी उपबाजार आवारात कांदा लिलावात व्यापाऱ्यांकडून रास्त दराने बोली लागत नसल्याची स्थिती आहे. गत सप्ताहात शेतकऱ्यांनी दर पाडून खरेदीच्या प्रकरणावरून लिलाव बंद पाडले होते. यावर व्यवस्थापनाने मध्यस्थी करत असे प्रकार घडणार नाहीत याबाबत आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा एकदा उपबाजारात व्यापाऱ्यांकडून मनमानी करत कमी दराने खरेदी करण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे, की वडांगळी (ता.सिन्नर) येथील कांदा उत्पादक शेतकरी माणिकराव खुळे यांनी ९ जून रोजी क्विंटल कांदा वडांगळी उपबाजार आवारात विक्रीसाठी आणला होता. बाजारात आणल्यानंतर व्यापाऱ्यांनी या मालाला प्रतिक्विंटल १,३५५ रुपये अशी बोली लावली. मात्र कांद्याच्या प्रतवारीच्या तुलनेत हा दर रास्त नसल्याने खुळे यांनी माल न देता मार्केटमधून बाहेर पडणे पसंत केले. येथील व्यवहार रद्द केल्यानंतर कांदा विक्रीसाठी त्यांनी लासलगाव गाठले. येथील बाजार समितीच्या आवारात दुपारच्या सत्रात त्याच वाहनातून माल लिलावासाठी नेला. येथे कांद्याला प्रतिक्विंटल १,६९० रुपयांची बोली लागली. त्यामुळे येथील दरात ३३५ दरात क्विंटलमागे वाढ मिळाली. म्हणजेच वडांगळी येथील उपबाजारातील दराच्या तुलनेत २२ टक्के बोली जास्त लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे व्यवस्थापन फक्त घोषणा करत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याचीच स्थिती आहे. 

शेतकऱ्यांची कुठली गैरसोय होणार नाही याबाबत सभापती लक्ष्मणराव शेळके यांनी याबाबत यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र असे असतानाही अजूनही एक आठवडा उलटून गेला नसताना व्यापारी पुन्हा मनमानी सुरू ठेवत असल्याचे समोर आले आहे. बाजार समिती व्यवस्थापनाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित व्यापाऱ्यांना योग्य त्या सूचना कराव्यात व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.  प्रतिक्रिया  शेतकऱ्यांची कृती नजरेत दिसते पण व्यापाऱ्यांची छुपी लूटखेळी नजरेत येत नाही. एकंदरीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून गृहीत धरले जात आहे. गावात मार्केट असूनही व्यापारी लॉबीमुळे शेतकऱ्याला ३५ कि. मी. अंतरावर मार्केटला माल नेऊन घालावा लागत आहे. यापेक्षा स्थानिकांच्या दृष्टीने वाईट काय असू शकते.  -माणिकराव खुळे, कांदा उत्पादक, वडांगळी 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com