मेगाभरतीसाठी शुल्क कमी करा : विरोधकांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्य शासनाने मेगाभरतीअंतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी सुरू केलेल्या पद भरतीकरिता खुल्या वर्गातील उमेदवारांना आकारण्यात येणारे ५०० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २५० रुपये हे शुल्क सुशिक्षित बेरोजगारांना परवडणारे नसल्याने ते अनुक्रमे १०० आणि ५० रुपये असे करावे, अशी आक्रमक मागणी करीत विधान परिषदेत विरोधकांनी मंगळवारी (ता. २) सभात्याग केला.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ३४ जिल्हा परिषदांमधील एकाच पदासाठी ३४ प्राधान्यक्रम द्यायचे असल्यास खुल्या प्रवर्गातल्या उमेदवाराला एका पदासाठी पाचशे या प्रमाणे सतरा हजार रुपये भरावे लागत आहेत तर राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना साडेआठ हजार रुपये भरावे लागत आहेत, ते सुशिक्षित बेरोजगारांना शक्य नसल्याने ते कमी करावेत. तसेच हे शुल्क कमी करून शंभर रुपये खुल्या वर्गासाठी तर राखीव प्रवर्गासाठी पन्नास रुपये करावे किंवा पाचशे रुपयांत सर्व जिल्हा परिषदांमध्ये उमेदवाराला अर्ज करता यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या वेळी केली.

राज्य सरकार ११ लाख विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेऊन महापोर्टलला ६० कोटी रुपये देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही भरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहे का? त्यांची लूट करून महापोर्टलची भरती करण्यासाठी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे शुल्क १०० रुपये व ५० रुपये करण्याबाबत त्यांनी आग्रह कायम ठेवला त्यास विरोधी पक्षातल्या इतर आमदारांनी जोरदार पाठिंबा दिला. 

याला उत्तर देताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ही भरती महाऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून होत आहे, असे सांगितले. जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज करता यावेत, यामुळे या भरती प्रक्रियेचे काम या पोर्टलला दिले असून उमेदवारांना सर्व सुविधा देण्यासंदर्भात हे शुल्क असल्याचे ते म्हणाले. मात्र राज्यमंत्री भुसे यांनी शुल्क कमी करण्यासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने व विरोधी सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तालिका सभापती रामराव वडकुते यांनी ही लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश दिले.

तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत सर्व सदस्यांची बैठक घेऊन शुल्क कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचेही ठरले. सुशिक्षित बेरोजगारांची लूट करणाऱ्या महापोर्टल आणि सरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com