संत्र्याची बांगलादेशला रेल्वेने होणार निर्यात

निर्यातदार तसेच रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला यश येत आंबिया बहरातील संत्र्यांची पहिली खेप सोमवारी (ता. १९) बांगलादेशला रवाना होणार आहे.
nagpur orange
nagpur orange

अमरावती : निर्यातदार तसेच रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला यश येत आंबिया बहरातील संत्र्यांची पहिली खेप सोमवारी (ता. १९) बांगलादेशला रवाना होणार आहे. तब्बल ४६० टन संत्रा रेल्वेच्या माध्यमातून पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये पोहोचणार आहे.

संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि वेगवान पर्याय आहे. संत्रा उत्पादकांना हा पर्याय उपलब्ध व्हावा याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. देशाच्या काही भागात शेतमाल वाहतुकीकरिता किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याच धर्तीवर संत्रा उत्पादकांसाठी देखील ही सुविधा असावी अशी त्यांची मागणी होती. त्याची दखल घेत रेल्वे बोर्डाने देखील या संदर्भाने उत्पादक, निर्यातदारांशी चर्चा केली. त्याची फलश्रुती म्हणून सोमवारी संत्रा नगरी वरुड रेल्वे स्थानकावरून बांगलादेशमधील बेनापोल स्थानकापर्यंत ४६० टन संत्र्याची वाहतूक होणार आहे. ४५४० रुपये प्रति टन असा यावर खर्च होणार आहे. एका पार्सल व्हॅनमध्ये सरासरी २३ टन संत्रा राहतो. त्यानुसार वीस पार्सल व्हॕनच्या माध्यमातून ही वाहतूक होईल. श्रमजीवी नागपुरी संत्रा प्रोड्यूसर कंपनी, रियाज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी,  एम. के. सी.,  ॲग्रोफ्रेश लिमिटेड, ए.आर.सी.फ्रूट वरुड, एस.एफ.सी., जे. के. फ्रुट कंपनी, ताज फ्रुट कंपनी, डायमंड फ्रुट कंपनी यांचा संत्रा बांगलादेशला जाणार आहे.

फायदेशीर पर्याय संत्र्याची आजवर रस्ते वाहतूक होत होती. हा पर्याय खर्चीक आणि वेळकाढू ठरत होता. आता थेट बांगलादेशपर्यंत संत्र्याची काही तासातच वाहतूक होणार आहे. संत्र्याची टिकवण क्षमता कमी असल्याने हे संत्रा उत्पादकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.  प्रतिक्रिया नागपुरी संत्र्याची टिकवण क्षमता कमी असल्याने रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या काही तासातच बांगलादेश पर्यंत संत्रा पोहोचविता येणार आहे. ही बाब सुखावणारी असली तरी बांगलादेशमध्ये प्रति किलो ४० रुपये आयात शुल्क आकारले जाते. संत्रा दरापेक्षा ते जास्त ठरते. इम्पोर्ट ड्युटी कमी झाल्यास निर्यात वाढण्यास मदत होईल. - रमेश जिचकार, कार्यकारी संचालक, श्रमजीवी नागपुरी संत्रा प्रोडूसर कंपनी, वरुड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com