
परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( हवामानाकुल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण झाली आहेत. १५ हजार ४३४ लाभार्थीं शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) व्दारे ४७ कोटी २३ लाख ८५ हजार ६२१ रुपये अनुदान जमा करण्यात आले. अजून २ हजार ३१९ शेतकऱ्यांची अनुदान अदायगी प्रलंबित आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
‘पोकरा’अंतर्गंत तीन टप्प्यांत जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायतींतील २७५ गावांची निवड झाले आहे. या गावांमध्ये सूक्ष्म नियोजन करून गावविकास आराखडे तयार केल्यानंतर विविध घटकांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ५४ हजार ४०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी ५० हजार ७२२ शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. त्यानंतर २९ हजार ८८४ घटकांसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. फळबाग लागवड, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, विहिरी आदी घटकांची कामे पूर्ण केलेल्या तसेच कृषी यांत्रिकीकरणा अंतर्गत अवजारे, ठिबक, तुषार संच, शेडनेटगृह, पॉलिहाऊस खरेदी करून अनुदानासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन देयके सादर केलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे (डीबीटी) ४७ कोटी २३ लाख ८५ हजार ६२१ रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली.
कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी मुंबई येथील ७ व्या डेस्क स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या २ हजार ३१९ आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच अनुदान जमा होईल, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.