खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ. सूर्यवंशी

केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच उत्पादन मिळू शकते. खोडवा उसामध्ये पाचट कुजविणे, आंतरमशागत, खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, कंपोस्ट खत, पाणी नियोजन ही पंचसूत्री योग्य पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन मिळते,’’ असे मत कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ. सूर्यवंशी
Panchasutri important in sugarcane : Dr. Suryavanshi

केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच उत्पादन मिळू शकते. खोडवा उसामध्ये पाचट कुजविणे, आंतरमशागत, खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, कंपोस्ट खत, पाणी नियोजन ही पंचसूत्री योग्य पद्धतीने केल्यास चांगले उत्पादन मिळते,’’ असे मत कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), तालुका कृषी अधिकारी केजतर्फे धनेगाव (ता. केज) येथे किसान गोष्टी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना खोडवा ऊस व्यवस्थापन या विषयी डॉ. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘‘ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पट्टा पद्धतीमध्ये संपूर्ण पट्ट्यामध्ये पाचट बसवावे. सलग सरी पद्धतीमध्ये पाचट कमी असल्यास एक आड एक सरीत बसवून घेऊन सरीचा बोध (वरंबा) रिकामा करावा. अलीकडे ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी करण्याचे यंत्र मिळते. यंत्राने सर्व पाला कुट्टी करून बारीक करावा. पालाकुट्टी किंवा अखंड पाचट प्रत्येक सरीत किंवा एक सरी आड दाबावे. त्यानंतर १ लिटर कंपोस्टिंग जिवाणू संवर्धक २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारावे. या पाचटावर एकरी एक गोणी युरिया आणि एक गोणी सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. त्यामुळे पाचट कुजण्यास मदत होते. सूक्ष्म जिवाणूंना नत्र व सल्फर ही अन्नद्रव्ये मिळतात.’’ 

‘‘सरीमध्ये जमेल तसे पाणी द्यावे. पाचटावर माती पडेल, अशा रीतीने बगला फोडाव्यात. माती व पाण्याने आर्द्रता वाढते. पाचट कुजण्याची क्रिया जलद घडते. बोधावर आलेले उसाचे बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत तासून घ्यावेत. म्हणजे उसाचा फुटवा जमिनीतून येईल. छाटलेल्या बुडक्यावर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. चार ते पाच महिन्यांत प्रत्येक सरीतील पाचट कुजून कंपोस्ट खत तयार झालेले असते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाचट आच्छादन म्हणून उपयोगी पडते,’’ असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com