खानदेशात पपई दराबाबत कोंडी कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

धुळे  : पपई दराबाबत खानदेशात शेतकऱ्यांची मागील महिनाभरापासून कोंडी कायम आहे. आजही पपईचा दर तीन ते साडेतीन रुपये प्रतिकिलोच आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीचे व्यापारी कुठल्याही परवान्याशिवाय धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत राजरोस खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, प्रशासन कुठलाही हस्तक्षेप करायला तयार नाही. 

दरम्यान, नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका बैठकीत पपईला पाच रुपये किलो असा दर मिळावा, अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास पपई काढणी बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे.

मध्यंतरी शेतकऱ्यांशी संबंधित संघटनांनी शिरपूर, शहादा येथे बैठका घेतल्या. परंतु दराची कोंडी फुटली नाही. दुष्काळी स्थितीमुळे पपईची लागवड कमी आहे. नंदुरबार जिल्ह्यात फक्त तळोदा, शहादा व नंदुरबार तालुक्‍यातील तापीकाठावरील गावांमध्ये तसेच धुळ्यात शिरपूर व शिंदखेडामधील तापीकाठावरील गावांमध्ये आणि जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल तालुक्‍यात अधिक लागवड आहे. पपईचे दर नोव्हेंबरमध्ये १४ रुपये प्रतिकिलो, असे होते. थेट शेतातून खरेदीदार पपईची खरेदी करीत होते. परंतु त्यानंतर सातत्याने दरात घसरण झाली.

जे खरेदीदार आहेत, ते राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशात आहे. रावेर, यावल व चोपडा भागांत बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यांनी मध्यस्थ नियुक्त केले असून, राजरोस ही वाहतूक परराज्यात कुठल्याही चौकशीशिवाय सुरू आहे.

या मध्यस्थांकडे परवाने नाहीत, त्यांनी बाजार समित्यांची परवानगी घेतलेली नाही. त्यांची माहिती शेतकऱ्यांकडे असते, परंतु त्यातही त्यांनी किती माहिती वस्तुस्थितीनुसार दिली आहे, हादेखील मुद्दा आहे. यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तर बाजार समितीला चौकशी करताना अडचणी येतील. शेतकऱ्यांचे नुकसान होईल. शेतमाल नियमनमुक्त असल्याने थेट शेतात खरेदी करताना कोणतेही शुल्क खरेदीदार व शेतकऱ्यांना बाजार समितीला द्यावे लागत नसल्याने बाजार समित्याही या पपई खरेदीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या मानसिकतेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पपईला सद्यःस्थितीत किमान सात ते आठ रुपये प्रतिकिलोचा दर मिळायला हवा. कारण खर्च लक्षात घेता तीन रुपये प्रतिकिलोचा दर परवडणारा नाही, असे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेतकरी रोहित पटेल यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com