अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः वळसे पाटील

सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीसाठी दिलेली परवानगी बिनशर्त नाही. काही अटी घातलेल्या आहेत. त्याचे पालन सर्वांना करावेच लागेल,’’ असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः वळसे पाटील
Permission for races as soon as conditions are favorable: Valse Patil

पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मात्र, स्थिती अनुकूल होताच पुन्हा परवानगी दिली जाईल. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीसाठी दिलेली परवानगी बिनशर्त नाही. काही अटी घातलेल्या आहेत. त्याचे पालन सर्वांना करावेच लागेल,’’ असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ऊसभूषण पुरस्कारार्थींची घोषणा करण्यासाठी ते रविवारी (ता. २) साखर संकुलामध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख व संचालक संभाजी कडू पाटील यावेळी उपस्थित होते. 

खंडपीठाकडे विषय जाईल ‘‘यापूर्वी बराच काळ बैलगाडा शर्यतींवर बंदी लावण्यात आली होती. शर्यती सुरू करण्यासाठी राज्याच्या सर्व भागातील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी चालू होती. आनंदाची बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने काही अटीशर्तींवर शर्यतीला मान्यता दिली आहे. मात्र, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा विषय अजून चालूच आहे. शर्यतींना मान्यता देण्याचा निर्णयदेखील अंतरिम स्वरूपाचा आहे. त्यामुळे वेगळे चित्र दिसल्यास हा विषय पुन्हा खंडपीठासमोर जाऊ शकतो. त्यामुळे बेकायदेशीर शर्यती भरणार नाहीत व नियमांचे पालन होईल, यासाठी स्थानिक पातळीवर काळजी घेतली जात आहे,’’ असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

‘‘स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून शर्यत भरविण्यास मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. मात्र, ओमिक्रॉनचा संसर्ग पाहून राज्य शासनाने केंद्राशी सल्लामसलत करून काही दिवसांपासून कोविड नियंत्रणासाठी काही निर्बंध लावले आहेत. त्याअंतर्गत काही ठिकाणी शर्यतींना परवानगी नाकारली आहे. मात्र, स्थिती अनुकूल होताच शर्यती भरविल्या जातील,’’ असेही ते म्हणाले.

पुणे जिल्हा बॅंक देशात एकमेव पुण्याच्या आसपास ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये सुबत्ता आणण्यात दुग्धउद्योग व जिल्हा बॅंकेचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘‘सभासद शेतकऱ्यांना शेतीसाठी पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कृषी कर्ज देणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही देशातील एकमेव बॅंक आहे. ११ हजार कोटींच्या ठेवी आहे. यामुळे बॅंकेच्या कारभाराची जबाबदारी मोठी आहे. संचालक मंडळाच्या योग्य कामकाजामुळे बँकेची वाटचाल सतत प्रगतिपथावर होत आहे,’’ असे ही वळसे पाटील म्हणाले.  

 ‘तो’ निर्णय सहकारमंत्रीच घेतील कोविडमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यासाठी आपण काय भूमिका घेतली आहे, असे विचारता गृहमंत्री म्हणाले की, सहकारी संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांना ‘ब्रेक’ लावण्याबाबत सरकारच्या पातळीवर काहीही निर्णय झालेला नाही. ती बाब सहकार खात्याच्या अखत्यारित येते व त्याबाबत योग्य तो निर्णय सहकारमंत्रीच घेतील.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com