राज्यात डाळिंब किड-रोगांच्या कचाट्यात 

डाळिंब बागांत पाकळी कुजव्याचे (बुरशीजन्य रोग) प्रमाण वाढले असून, त्यात आता तेलकट डाग रोगाचीही भर पडत असल्याने डाळिंब उत्पादक संकटात सापडला आहे.
pomegranate
pomegranate

सोलापूर ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सततचा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे जुलै-ऑगस्टचा बहार धरलेल्या डाळिंब बागांत पाकळी कुजव्याचे (बुरशीजन्य रोग) प्रमाण वाढले असून, त्यात आता तेलकट डाग रोगाचीही भर पडत असल्याने डाळिंब उत्पादक संकटात सापडला आहे. सोलापूर, सांगली, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.  गेल्या दोन-तीन वर्षापासून डाळिंब उत्पादक सातत्याने अडचणीत येत आहेत. एकीकडे डाळिंबाला मिळणारा दर आणि दुसरीकडे वाढणारी किड-रोग या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्याची दमछाक होत आहे. त्यात यंदा मात्र अधिकच्या पावसाने नुकसानीला तोंड देण्याची वेळ आली आहे.  जुलै-ऑगस्ट बहराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी डाळिंब बागेत मशागत केली. त्यानंतर जूनमध्ये बागेची छाटणी करून खते दिली. तसेच रोग, कीड लागू नये, यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला. परंतु महिनाभरापासून सतत पाऊस पडत आहे. तर वातावरणात सारखा बदल होत आहे. सकाळी धुके पडत आहे. त्यामुळे डाळिंब बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला नसल्यामुळे फळधारणा होण्यात अडचणी येत आहेत. सोलापूर, सांगली, पुणे आणि उस्मानाबादमधील ९० टक्के डाळिंब बागांत फुल गळती, फळगळती आणि पाकळीकुजची समस्या आहे. सांगलीतील आटपाडी तालुक्यात १५ हजारहून अधिक हेक्टर, सोलापूर जिल्ह्यातील ४० हजाराहून अधिक हेक्टरला त्याचा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर भागात ही समस्या अधिक आहे. त्यात आता दमट वातावरण अधिक वाढल्याने तेल्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढला आहे. परागीकरणाचा प्रयोगही अयशस्वी डाळिंबामध्ये फळधारणेचे प्रमाण वाढावे, यासाठी शेतकऱ्यांनी मधमाश्यांसाठी पेट्या विकत आणल्या. परंतु सततच्या पावसामुळे परागीकरणाचा प्रयोगही यशस्वी झाला नाही. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मोहोळ, माढा, माळशिरस सांगली जिल्ह्यातील आटपाडी भागात असे प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केले आहेत. पण त्यावर पाणी फिरले आहे. प्रतिक्रिया सततच्या पावसामुळे डाळिंबावर पाकळी कुजवा म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी त्यावर वेळीच फवारण्याही केल्या. पण पुन्हा पावसाने त्या धुऊन गेल्या. त्यातच सध्या अनेक बागा फळधारणेच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नुकसान वाढले आहे. सध्याच्या परिस्थितीत फवारण्या करणे हाच उपाय आहे.  - डॉ. ज्योत्सना शर्मा, केंद्र संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

यंदा जूनमध्ये शेतकऱ्यांनी पानगळ करुन मृगबहर धरला, त्यानंतर २१ दिवसांनी कळी दिसू लागली. पण सततच्या पावसाने ती गळली, त्यानंतर पुन्हा पानगळ करण्यात आली, याप्रमाणे तीन-तीनवेळा पानगळ केली, पण कळीचे सेटिंग काही होऊ शकलेले नाही. आता झाडांची ताकद संपली आहे, आता काय करणार, दुसरा मार्गही उरला नाही. - किशोर देशमुख, शेतकरी, भिसेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली   सध्या पाकळीकुजची सर्वाधिक समस्या भेडसावते आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन टप्प्यांत तीन बागांचे बहर धरले आहेत. एका बागेत कळी निघाली आहे, एका बागेत ६० ते ७० ग्रॅमचे फळ तयार झाले आहे. या तीनही बागांच्या पानगळीपासून कळी ते आता फळांपर्यंत अडचणी आल्या. रोज फवारण्या करतो आहे. एकही दिवस गेला नाही की फवारणी केली नाही. एवढा खर्च पुढे निघेल का शंका आहे.  - ज्ञानेश्वर वाघमोडे, शेतकरी, चळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com